मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारपासून पुण्यात आहे. यावेळी मनसेच्या तीन कार्यालयांची उद्घाटनं देखील त्यांच्या हस्ते करण्यात आली. यासह पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चाही केली. दरम्यान, पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना राज ठाकरेंच्या पाठिशी मनसेचे नेते वसंत मोरे पाहायला मिळाले. वसंत मोरे आणि राज ठाकरेंच्या या भेटीची सध्या पुण्यात जोरदार चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एका पत्रातून वसंत मोरे यांच्यावरच निशाणा साधला होता. त्यानंतर मोरे यांनी राजकारण सोडण्याची भाषा अप्रत्यक्षपणे केली होती. दरम्यान पुण्यात दोघे एकत्र दिसल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. सध्या राजकीय वर्तुळात धायरी येथील कार्यलय उद्घाटन सोहळा चर्चेत आला आहे. पुण्यातील खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी ज्या वसंत मोरेंवर आहे, ते मोरे राज ठाकरेंच्या खुर्चीला धरुनच उभे दिसले. यावेळी एक किस्साही घडला आहे.
(हेही वाचा – Covid-19 Nasal Vaccine: ‘या’ लोकांना घेता येणार नाही नेझल वॅक्सिन)
राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले होते. त्यावेळेस खुर्चीवर बसताना त्यांनी मिश्कील प्रश्न विचारला, “खुर्ची व्यवस्थित आहे ना?, मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती.” राज ठाकरेंच्या या प्रश्नावर वसंत मोरेंनी त्वरीत उत्तर दिले. “चंद्रकांत पाटील यांची तुटली होती.” तसेच, “साहेब तुम्ही बसा, मी मागे आहेच…”, असे मोरेंनी राज ठाकरेंना म्हटले. राज ठाकरेंनी पाठीमागे वळून पाहात वसंत मोरेंवर कटाक्ष टाकल्याचेही पाहायला मिळाले. या प्रसंगाची आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. कार्यालयाच्या उद्घाटनावेळी राज ठाकरेंना भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार होताच राज ठाकरेंनी एक मिश्किल टिप्पणी केली. तुम्ही बहुतेक मला आता साधू करूनच सोडणार…यानंतर एकच हास्यकल्लोळ बघायला मिळाला.