… अन् राज ठाकरेंच्या एकनिष्ठ मनसैनिकाला रडू कोसळलं

138

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मनसेतही चांगलीच खळबळ माजली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी राज्याचे राजकारण दणाणून सोडले आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्याने मोरेंची गुरूवारी मनसेने शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. त्यांच्याजागी बाबर यांना मनसेचे पुणे शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आता वसंत मोरे यांना राष्ट्रवादी, शिवसेनेकडून ऑफर येऊ लागल्या आहेत. मात्र, आजही ते मनसेवर ठाम आहेत. पण, माध्यमांशी बोलताना आज राज ठाकरेंच्या एकनिष्ठ मनसैनिकाला अश्रू अनावर होऊन रडू कोसळलं.

… त्यावर पाणी फिरलं का?, मोरेंची खंत

”वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला. तो जल्लोष 9 जुलै 2021 मध्ये झाला होता, ज्यादिवशी मी त्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. पण, गुरूवारी मला एक बाब खटकली, ती म्हणजे वसंत मोरेचं पद गेल्यानंतर फटाके वाजले, आनंदोत्सव साजरा झाला, मिरवणूक निघाल्या, असं का?” असा प्रश्न वसंत मोरेंनी विचारला. विशेष म्हणजे माझे सगळेच कार्यकर्ते, मित्र आणि पदाधिकारीही म्हणतात वसंत मोरे आल्यापासून पक्षात जान आली, पक्ष वाढला आहे. मग, मी एवढे वर्षे पक्षासाठी जे केलं, त्यावर पाणी फिरलं की काय, असं मला वाटतंय, असेही वसंत मोरेंनी म्हटलं.

… अन् मुस्लीम पुढे सरसावल्याने मोरे भारावले

एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं ते स्टेटमेंट आलं होतं. पण, मी आजपर्यंत पक्षाच्याविरोधात काहीही केलं नाही. पक्षाचे काही झारीतील शुक्राचार्य आहेत, त्यांची तक्रारी मी राज ठाकरेंकडे केली आहे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडेही केली आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई न करता, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर कारवाई झाली. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी मुस्लीम लोकं रस्त्यावर उतरले. एका हिंदुच्या समर्थनासाठी मुस्लीम पुढे सरसावल्याने मीही भारावलो होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.