कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपाने टिळक घराण्याबाहेरचा उमेदवार दिल्याने ही लढत बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचे समजते.
भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संधी देण्याऐवजी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात काँगेसने रवींद्र धंगेकर यांना तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे ही लढत दुरंगी होण्याची चर्चा असतानाच आता मनसेनेही कसबा पेठ मतदारसंघात आपला उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.
( हेही वाचा: भाजपकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाला संधी नाही; चिंचवडमधून लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला उमेदवारी )
त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत असून, ते पुणे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. यावेळी शहर कार्यकारणीने तयार केलेल्या कसब्यासाठीच्या इच्छुकांच्या यादीचा आढावा घेणार आहेत. राज यांनी अंतिम शिक्कामोर्तब केल्यानंतर सोमवारी ६ फेब्रुवारीला मनसेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘ही’ नावे चर्चेत
दरम्यान, कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मनसेकडून गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर, निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे आदी नावे चर्चेत असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community