छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार न करता तिथीनुसार करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर, येत्या सोमवारी २१ मार्च रोजी होणारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यासाठी मनसैनिक कामाला लागला आहे. त्यामुळे मुंबई सह राज्यात शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करताना दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील अश्वारूढ पुतळ्यावर मनसेच्या वतीने हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास महाराजांच्या पुतळ्यावर ही पुष्पवृष्टी केली जाणार.
राज ठाकरेंचे आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील मनसेच्या १६ व्या वर्धापनदिन बोलताना महाराजांची जयंती तारखेनुसार नाही, तर तिथी नुसार व्हायला पाहिजे अशी भूमिका जाहीर करत मनसेच्या वतीने तिथीनुसारच शिवजयंती साजरी केली जावी, असे आवाहन मनसैनिकांना केले. महापुरुषांची जयंती ही तिथी नुसारच साजरी व्हायला पाहिजे,असे सांगत आपण तिथीनुसारच ही साजरी करणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात येत्या २१ मार्च रोजी साजरी होईल असे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर आता मनसैनिक कामाला लागले असून, प्रत्येक शाखा आणि गल्लीबोळात या दिवशी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.
( हेही वाचा: रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्टची सफाई ‘रिमोट’द्वारे! )
मनसेच्या झेंड्यांनी परिसर भगवामय
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातही महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्यावतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्यवृष्टी केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थित ही पुष्पवृष्टी केली जाणार आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे आणि सरचिटणीस शशांक नागवेकर यांनी पुढाकार घेत शिवाजी महाराज पार्क परिसर मनसेच्या झेंड्यानी भगवामय करून टाकला आहे. शिवाजी पार्कचा परिसर मनसेच्या झेंड्यानी उजळून गेला आहे.
Join Our WhatsApp Community