निवडणूक कधी होतील हे माहित नाही. सध्या महापालिकेचा विषय आला की मागील २ वर्षे दहावीला नापास झाल्यासारखे वाटते. मार्चला निवडणुका होतील म्हणतात मार्च आल्यावर ऑक्टोबर होतील म्हणतात, ऑक्टोबर आल्यावर पुन्हा मार्चला निवडणुका होतील म्हणतात. पण जेव्हा महापालिका निवडणुका होतील आपण सत्तेत असणार म्हणजे असणारच, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने ठाण्यात ते मनसैनिकांना मार्गदर्शन करत होते. ही जनता या तमाम लोकांना विटली आहे. पण आपण सगळ्यांनी जनतेपर्यंत जायला पाहिजे. आपण सत्तेपासून दूर राहणार नाही. पक्ष स्थापन करताना पक्षाचे नाव काय ठेवायचे, हा विचार होता, तेव्हा मनात नवनिर्माणाचा विचार होता. आता जे महाराष्ट्रात चालू आहे ते महाराष्ट्र खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. इतके गलिच्छ राजकारण सुरु आहे. खालच्या थरावर जाऊन बोलत आहेत, मर्यादाच राहिलेली नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
प्रत्येक राजकीय पक्षाला त्रास होतो, आज भाजप सत्तेत दिसतोय, पण कित्येक लोकांनी त्यासाठी खस्ता खाल्ला होता. १९५२ साली जनसंघ स्थापना झाला होता, तेव्हापासून २०१४ पर्यंतचा जो काळ आहे. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. लगेच आकडे मोजू नका, मी इतकी वर्षे घालवू देणार नाही, मी लवकर सत्ता आणेन, मी फक्त अशा दाखवत नाही, करून दाखवेन, असेही राज ठाकरे म्हणाले.