कोरोनाचा संसर्ग अजूनही राज्यात सुरूच आहे, तिसऱ्या लाटेची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध हटवले नाही. मात्र असे असले तरी मनसे मात्र आता सण-उत्सवावरील निर्बंध अधिक काळ सहन न करण्याच्या मनस्थितीत आहे. त्याची सुरुवात ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवापासून होणार आहे.
अभिजीत पानसे यांची घोषणा!
मनसेने याची जणू अधिकृत घोषणा केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. त्यानिमित्ताने मनसे नेता अभिजीत पानसे यांनी दहीहंडी ठाण्यात सर्वात मोठी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनेक मंडळांना आवाहन केले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करा, असे अभिजित पानसे यांनी म्हटले आहे. मनसेच्या या आवाहनामुळे आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलिस याबाबत काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही याबाबत तयारी सुरु केली आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे दहीहंडीचा विषय आतापासून राजकीय पटलावर आला आहे, यामुळे राज्य सरकारची गोची होणार आहे.
(हेही वाचा : आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करा! अशोक चव्हाणांची मागणी)
यंदा ठाण्यात मनसे हंड्या बांधणार!
दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षी 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले होते. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता दहीहंडीच्या पंढरीत मनसे यंदा हंड्या बांधण्याच्या मनस्थितीत आहे.
Join Our WhatsApp Community