येत्या ५ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर असून मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांच्या एकावर एक बैठका होत आहेत. या बैठकीत दौऱ्याच्या तयारीचा आढावा देखील घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून किती कार्यकर्ते अयोध्येला दाखल होणार आहेत, त्यासाठी किती ट्रेन लागणार आहेत. कोणत्या विभागातून किती गाड्या निघणार आहेत. या सर्वांचा आढावा घेतला जात आहे.
राज्यातून साधारण १५ हजार मनसैनिक अयोध्येला जाणार
राज्यातून साधारण १५ हजार मनसैनिक अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर काही उत्तर भारतीय कार्यकर्ते राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. यासाठी १२ ट्रेन्स, १०० गाड्याभरून अयोध्येत दाखल होणार आहेत. या दौऱ्यापूर्वी २२ मे रोजी पुण्यात राज ठाकरेंची एक सभा होणार आहे. मुंबई, ठाणे,औरंगाबाद नंतर राज ठाकरेंची पुण्यातील सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेत राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यासंदर्भात मनसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना देण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – ‘मनसे’चं ठरलं! पुण्यात ‘या’ तारखेला होणार राज ठाकरेंची सभा)
प्रत्येक विभाग अध्यक्षाकडून रेल्वेची एक बोगी बुक
राज ठाकरेंचा ५ जून रोजी अयोध्या दौरा असल्याने मुंबईतून अयोध्येत जाण्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. मुंबईतील प्रत्येक विभाग अध्यक्षाने रेल्वेची संपूर्ण एक बोगी बुक केली आहे. अयोध्येला येणाऱ्या लोकांची शाखानिहाय नोंदणी प्रक्रियादेखील सुरू केली आहे. मुंबईत मनसेचे एकूण ३६ विभाग अध्यक्ष आहेत हे सर्वजण अयोध्या दौऱ्याच्या तयारासाठी कामाला लागले आहेत, अशी माहिती मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community