लसीकरणाआधी मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लसीकरणात येणाऱ्या अडचणींकडे वेधले लक्ष!

जर योग्य नियोजन नसेल, तर आपण आपले उद्दिष्ट कसे साध्य करणार आहोत. आज असलेला लसींचा तुटवडा आपण कशाप्रकारे भरणार आहोत.

82

राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असून, त्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. आधीच लसीकरणाच्या तुटवड्यावरुन राज्यात गोंधळ सुरू असताना, 1 मे पासून जर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले, तर अधिक अडचणी येऊ शकतात, असे मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच त्यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत.

काय आहे मनसेच्या पत्रात?

प्रथमतः आपले आभार, आज आपल्या सरकारने (नामदार नवाब मलिक यांच्याद्वारे) १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. पण ही घोषणा आणि वास्तव यात तफावत दिसून येत आहे. आज घडीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत लसींचा तुटवडा जाणवत आहे. बऱ्याच ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. अशा परिस्थतीत जर योग्य नियोजन नसेल, तर आपण आपले उद्दिष्ट कसे साध्य करणार आहोत. आज असलेला लसींचा तुटवडा आपण कशाप्रकारे भरणार आहोत.

येत्या काही दिवसांत ५ विविध गटांतील नागरिक लसींसाठी रांगेत उभे राहतील.

  • ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक(पहिला डोस घेणारे)
  • ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक(दुसरा डोस घेणारे)
  • ४५-५९ वयोगटातील(पहिला डोस घेणारे)
  • ४५-५९ वयोगटातील दुसरा डोस घेणारे (२९ एप्रिल किंवा १२ मे पासून)
  • १८ ते ४४ वयोगटातील (पहिला डोस घेणारे)

(हेही वाचाः कोविड सेंटर उभारणीसाठी महापालिकेला नगरसेवक, सामाजिक संस्थांची साथ!)

कशी हाती घेणार लसीकरण मोहीम?

मात्र सध्याचे नियोजन पाहता, जी परिस्थिती आहे त्याच्या किती तरी पटींने ती वाढणार आहे. कालच गोरेगाव येथील केंद्राबाहेर १ किमी लांब रांग होती. वडाळा येथील केंद्र, २ दिवस बंद आहे. नवी मुंबई येथील निम्म्याहून अधिक केंद्रं बंद आहेत. हीच परिस्थिती पुणे, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, पालघर, सोलापूर, धाराशिव येथील केंद्रांवर आहे. आपण जागतिक टेंडरद्वारे लसींची खरेदी करणार असल्याचे वाचनात आले, पण यात किती दिवस जाणार याची आपणास कल्पना आहे का? महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे ११.५ कोटी, यातील १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या अंदाजे ९ कोटी. आजवर झालेले लसीकरण (पहिला डोस १.२३कोटी, दुसरा डोस १९ लाख, एकूण १.४२ कोटी) उर्वरित ७.५ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

(हेही वाचाः आता मोफत लसीवरुन ठाकरे सरकारमध्ये ‘रस्सीखेच’!)

साहेब, या कठीण प्रसंगात लसीकरणाशिवाय पर्याय नाही, हे आपण जाणता, मग यात नियोजनाचा अभाव का? आपणास नम्र विनंती आहे, या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन, तात्काळ लसींची उपलब्धता वाढवून, महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आपण योग्य कारवाई करावी, असे मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.