मशिदींवरील ध्वनिक्षेपकांचा प्रश्न हा धार्मिक नसून सामाजिक त्रासाचा आहे. आमच्या पक्षाचे कोणत्याही धार्मिक समुदायाच्या विरोधात कोणतेही धोरण नाही. परंतु आम्ही राष्ट्रवाद मानणारे लोक आहोत. आम्ही या देशाचे कायदे, संविधान, न्यायालयीन आदेश हे सर्वोपरी मानतो. या देशापेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करणार असेल अथवा तसे दर्शवून चिथावणी देणार असेल तर राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून आम्ही त्याचा विरोध करत राहणार आहोत. त्यामुळे ३ मे पर्यंत मशिदींवरील बेकायदा व या देशातील न्यायव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या भोंग्यांवर कारवाई करून आपल्या घटनात्मक कर्तव्यांचे पालन करावे अशाप्रकारच्या विनंतीचे पत्र मनसेचे उपाध्यक्ष व माहिम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी अप्पर पोलिस आयुक्त,सह पोलिस आयुक्तांना पाठवले आहे.
कायदा राबवणे हे पोलिसांचे घटनात्मक कर्तव्य
यशवंत किल्लेदार यांनी सह पोलिस आयुक्त तसेच अप्पर पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयच्या सन २०१६ साली दिलेल्या सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकासंदर्भातील निर्देशानुसार व देशातील मुंबई व कलकत्ता आदी उच्च न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांनुसार रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत अपवादात्मक परिस्थिती वगळता धनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक अशा सर्व संदर्भात लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय तथा आदेश हा त्या संदर्भातील कायद्याप्रमाणेच मानला जातो व केवळ संसदेच्या पारित विधेयकाद्वारे अथवा महामहिम राष्ट्रपतींद्वारे काढण्यात आलेल्या वटहुकुमान्वये केवळ तो रद्दबातल होऊ शकतो. तात्पर्य, प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपकासंदर्भातील आदेश हा कायदा आहे व पोलीस दल ही लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहे, तेव्हा हा कायदा राबवणे हे पोलिसांचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे म्हटले आहे.
डेसीबल मर्यादेचे उल्लंघन
मुस्लिम धर्मीय प्रार्थना स्थळ अर्थात मस्जिद वर लावलेल्या बेकायदेशीर भोंग्यावरून दिवसभरातून ५ वेळा अजान ध्वनिक्षेपित केली जाते. ही अज़ान बहुतेक वेळेस विहित डेसीबल मर्यादेचे उल्लंघन करणारी असते. तसेच या अजान च्या वेळा पहाटे चार पासून रात्री बारा पर्यंतच्या असतात काम करणाऱ्या व्यक्ती, विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच या अजानमुळे त्रास सहन करावा लागतो. दुसरा मुद्दा, मशिदींवरून ध्वनिक्षेपित केल्या जाणाऱ्या अजान मध्ये गैरमुस्लिम समाजांच्या भावना दुखावणारे शब्द त्यांना जबरदस्तीने ऐकावे लागतात. अल्ला हाच केवळ पूजनीय आहे किंवा अल्ला हाच केवळ सर्वश्रेष्ठ आहे अशी वाक्ये बिगरमुसलमान व्यक्तींच्या मनात चीड उत्पन्न करणारी असतात.
कारण प्रत्येक धर्मात त्या त्या धर्माच्या आराध्य व उपास्य देवता असतातच. या ध्वनिक्षेपित होणाऱ्या प्रार्थना या धार्मिक आक्रमणाचाच भाग आहे व त्यामुळे तो भारतीय दंड संहिता कलम १५३ / अ चा भंग ठरतो व कारवाईस पात्र रहातो. मशिदींवरचे ध्वनिक्षेपक हे बहुतेक वेळा कोणत्याही प्रकारची व कोणत्याही आधिकारीक संस्थेची परवानगी न घेता लावले गेलेले आहेत आणि जर एखाद्या वेळेस पूर्वी परवानगी घेतलेली असेल तर निश्चितपणे तिचे नूतनीकरण केलेले नसते. कारण दुर्दैवाने विशिष्ट समुदाय हा या देशाच्या राजकीय प्रणालीत नेहमीच कायद्याच्या वर मानला गेला आहे,असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या पत्रातील मुद्यांचा विचार करावा आणि येत्या ३ मे पर्यंत मशिदींवरील बेकायदा व या देशातील न्यायव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या भोंग्यांवर कारवाई करून आपल्या घटनात्मक कर्तव्यांचे पालन करावे अशाप्रकारची विनंती त्यांनी या पत्राद्वारे करत पोलिस प्रशासनाला ३ मे पूर्वी कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला आहे.
Join Our WhatsApp Community