राणा दाम्पत्य मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणणार आहेत, त्यासाठी ते मुंबईत ठिय्या मांडून आहेत. त्यांना मातोश्रीत अटकाव करण्यासाठी तिथे सकाळपासून शिवसैनिकांनी ठिय्या मांडला आहे. रात्री जेव्हा भाजपचे नेते मोहित कंबोज यांची गाडी कलानगर येथे आली, तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
कंबोज यांनी आरोप फेटाळले
जेव्हा कंबोज यांची गाडी कलानगर येथे आली, तेव्हा तिथे जमलेल्या शिवसैनिकांना मोहित कंबोज हे रेकी करण्यासाठी आले होते, असा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी गाडीवर धावून गेले. मात्र कंबोज यांनी त्यांची गाडी पुढे नेली. त्यावेळी शिवसैनिकांनी कंबोज यांच्यावर ते राणा दाम्पत्यांना मदतीसाठी रेकी करत होते, असा आरोप केला. मात्र कंबोज यांनी हा आरोप फेटाळून लावला. आपण एका विवाहासाठी गेलो होतो, तेथून परत येताना आपण या भागातून जात होतो, आपल्यावरील आरोप निराधार आहेत, असेही कंबोज म्हणाले.
कोण आहे मोहित कंबोज?
मोहित कंबोज हे व्यावसायिक असून केबीजे कंपनीचे ते मालक आहेत. सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते मुंबई भाजपचे माजी सचिव आणि माजी उपाध्यक्ष ही राहिले आहेत. भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष देखील होते. 2019 साली त्यांची मुंबई भाजपच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.