Monsoon Session 2024: राजकारण्यांचा दर्जा घसरतो आहे का?

113
Monsoon Session 2024: राजकारण्यांचा दर्जा घसरतो आहे का?
Monsoon Session 2024: राजकारण्यांचा दर्जा घसरतो आहे का?
  • सुजित महामुलकर

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या आठ दिवसांत आमदारांनी, विशेषतः विधान परिषदेतील सदस्यांनी, ज्या भाषेचा वापर केला ती पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी नाही. गेल्या काही महिन्यात राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा तर हा परिणाम नाही ना? की खरंच राजकारण्यांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, एवढे नक्की. (Monsoon Session 2024)

कुठे तुकोबारायांचा अभंग; कुठे ‘म-भ’ची बाराखडी

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ जूनला अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी राज्याचा आठ महिन्यांचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यात त्यांनी विठोबारायांचे अभंग आणि काही ओव्यांचा वापर अर्थसंकल्पावरील भाषणात केला. ‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे। ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर ऐसा विटेवर, देव कोठे।। ऐसे संतजन, ऐसे हरिचे दास ऐसा नामघोष, सांगा कोठे। तुका म्हणें, आम्हां अनाथाकारणें, पंढरी निर्माण केली देवें…’ या अभंगाने त्यांनी सुरुवात केली. तर आतापर्यंत आपण दहा वेळा या राज्याचा अर्थसंकल्प मांडला असल्याचे सांगत अर्थसंकल्पाच्या भाषणाचा समारोप ‘निंदी कोणी मारी। बंदी कोणी पूजा करी मज हे ही नाही ते ही नाही। वेगळा दोन्हींपासूनी…’ असा करत ‘तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही…’ या तुकोबारायांच्या शब्दांत भाषणाचा शेवट केला. तर सोमवारी १ जुलैला विधीमंडळात ‘म’ आणि ‘भ’च्या बाराखडीतील शिव्यांची नोंद विधीमंडळ इतिहासात झाली.

चारवेळा तडीपार झालेला मी शिवसैनिक!

शिवसेना उबाठा आमदार (UBT) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका राजकीय विषयावरील चर्चेदरम्यान भाजपाचे सदस्य प्रसाद लाड यांना भर सभागृहात सगळे नियम धाब्यावर बसवत ‘म-भ’वरून सुरू होणाऱ्या शिव्या हासडल्या. इतक्यावरच ते थांबले नाहीत. सभागृहातील गोंधळानंतर विधिमंडळाच्या आवारात टीव्ही माध्यमांशी बोलताना आपल्याला याबाबत पश्चाताप होत नाही, असेही आवर्जून सांगितले. त्यात भर घालत, लाड यांनी त्यांच्याकडे बोट दाखवले तर ‘बोट तोडण्याची’ भाषा त्यांनी केली. बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? हिंदुत्वासाठी केसेस अंगावर घेतल्या आहेत. माझ्यावर ७०-७५ केसेस आहेत. चार वेळा तडीपार झालेला मी शिवसैनिक आहे… हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत,’ असे दानवे यावेळी म्हणाले.

(हेही वाचा – Mahua Moitra यांच्या अडचणीत वाढ; दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल)

‘भगिनींचा अपमान झाला असेल, तर माफी मागतो’

मंगळवारी २ जुलैला दानवे यांच्या शिवीगाळ प्रकरणी गटनेत्यांच्या बैठकीत त्यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय झाला. दानवे यांची चूक लक्षात येताच नमती भूमिका घेत ‘दानवे यांच्या वर्तनाने, जर माता भगिनींचा अपमान झाला असेल, तर मी माफी मागतो. पण सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या प्रचारात माता-भगिनींचा जो अपमान केला, बहिण-भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यावर ते माफी मागणार का?’ असे राजकीय विधानही केले आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पाच दिवसांचे निलंबन ३ दिवसांवर

इतके सगळे होऊनही बुधवारी ३ जुलैला दानवे यांनी माफी काही मागितली नाहीच पण उपसभापती गोऱ्हे यांना पत्र लिहून ‘दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू परंतु नाही’ असे म्हटले. त्यावर गुरुवारी ४ जुलैला गटनेत्यांच्या बैठकीत त्यांचे निलंबन कमी करण्याचा निर्णय झाला आणि तसा पाच दिवसांचे निलंबन ३ दिवसांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव सभागृहाने एकमताने मंजूर केला. हे तीन दिवस गुरुवारी संपले आणि शुक्रवारी दानवे सभागृहात हजर झाले. (Monsoon Session 2024)

(हेही वाचा – PUNE: पाणीकपातीचे संकट टळले, खडकवासला धरण प्रकल्पात ६ दिवसांत किती पाणी वाढले? वाचा सविस्तर…

‘दुसऱ्या पेट्या पाठवल्या तरी चालेल’

विधानसभेतही काही अपक्ष आमदारांनी १२ जुलैला होणाऱ्या विधान परिषदेचा संदर्भ देत सभागृहात बोलू देण्याविषयी टिप्पणी केली. गुरुवारी ४ जुलैला तर चक्क पेट्या देण्या-घेण्यावर सभागृहात चर्चा झाली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी ‘प्रश्न घ्या’ असे सांगत थोडक्यात प्रश्न मांडण्याची सूचना केली. त्यावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अपक्षांच्या बाबतीत असं काय करता? रोहितदादाला (रोहित पवार) बोलू दिले नाही. खरं तर रोहितदादाला बोलू द्यायला पाहिजे होतं. ते पेट्या पाठवतात सगळ्यांकडे. आंब्याच्या पेट्या… मी अपक्ष आहे. मला तर बोलू द्या. १२ तारखेला पुन्हा बोलायलाच लागणार आहे मला… असे बोलताच काही आमदारांमधून, ‘पेट्या कशाच्या ते सांगा.’ असे त्यांना विचारले. तर जोरगेवार म्हणाले, ‘आंब्याच्या पेट्या… दुसऱ्या पेट्या पाठवल्या तरी चालेल ना… आम्हाला काही अडचण नाही…’ आणि सभागृहात एकच हशा पिकला.

ऐतिहासिक सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात

गेली अनेक वर्षे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टिप्पणी करीत आहेत. मात्र, अशा पद्धतीची भाषा गेल्या काही महिन्यांत, लोकसभा निवडणूक प्रचारासह, कानावर पडू लागल्याने ऐतिहासिक सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याची ही नांदी आहे, अशी शंका येऊ लागली आहे. (Monsoon Session 2024)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.