येत्या १८ जुलैपासून सुरू होणारे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला या संदर्भात सूचित केल्यानंतर दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले.
( हेही वाचा : रविवारी बाहेर निघताय? मध्य आणि हार्बर मार्गावर या वेळेत असणार मेगाब्लॉक)
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पावसाळी अधिवेशन
शिंदे गटातील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपच्या साथीने युतीचे सरकार सत्तेवर आले. सत्तास्थापनेस जवळपास १५ दिवस लोटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये चलबिचलता वाढली आहे. आमदारांच्या निलंबनासंदर्भात ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण खंडपीठाकडे वर्ग करीत सुनावणी पुढे ढकलल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर दोन ते तीन दिवसांनी काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर २५ जुलै किंवा त्यानंतर पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी नियोजित वेळापत्रकानुसार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विधान भवनात मतदान होणार आहे. या दिवशी आवश्यक सुरक्षाव्यवस्था गृह विभागाने द्यावी. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेटी व इतर साहित्य वाहनाने विधान भवन ते मुंबई विमानतळ (टर्मिनल-२) येथे नेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा व्यवस्था तसेच वाहनासाठी विधान भवन ते मुंबई विमानतळ असा “स्वतंत्र मार्ग” राखीव ठेवावा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. आरोग्य विभागाने या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवक यांची नेमणूक करावी. सुरक्षा अधिकारी, तसेच निवडणूक प्रक्रियेचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरण करणारे प्रतिनिधी यांना विमानतळाच्या अंतर्गत भागात प्रवेश देण्याबाबत संबंधितांना विशेष प्रवेशपत्र देण्यात यावेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community