भाजपाला मोठं खिंडार! ५० कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन

173

भाजपाचे युवा कार्यकर्ते कैलास घोलप यांच्या नेतृत्वाखाली धसई परिसरातील ५० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपाला खिंडार पडले आहे. पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार, मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात सामान्यांना दिलासा देण्याबरोबर राज्य सरकारच्या वतीने घेतलेले कल्याणकारी निर्णय मुरबाडमधील तळागाळातील जनतेपर्यंत पोचवावे, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशानंतर केले. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे आणि प्रमोद गायकर यांची उपस्थिती होती.

(हेही वाचा – नॅशनल पार्कमध्ये गुजरातच्या सिंहाची गर्जना घुमण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं!)

मुरबाडमध्ये शिवसेनेचा प्रसार जोरदार 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व व जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाडमध्ये शिवसेनेचा प्रसार वेगाने सुरू आहे. राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांबरोबरच शिवसेनेच्या सेवाभावी उपक्रमांना मुरबाड तालुक्यात ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे, असे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.

देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून धसईची ओळख

देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून धसईची ओळख निर्माण करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कैलास विनायक घोलप यांनी प्रयत्न केले होते. राजकीय क्षेत्राबरोबरच कैलास यांचे सामाजिक कार्यही सुरू आहे. ते मुंबईतील सावरकर स्मारक समितीचे सदस्य असून, भूमिपूत्र शक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना धसई परिसरात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला आहे.

५० हून अधिक कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन

कैलास घोलप यांच्याबरोबरच सिताराम खंडू सुरोसे, माजी सरपंच भारती मेंगाळ, माजी सरपंच गौतम वाळकू वाघ, ओजिवलेचे उपसरपंच कृष्णा पवार, धसई सेवा सोसायटीचे चेअरमन पांडुरंग भोईर, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन उत्तम घोलप, लक्ष्मण घोलप, धसईच्या ग्रामपंचायत सदस्या विद्या घोलप, सारिका घोलप, जैतून आतार, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण घोलप, शिवाजी घोलप, सुजय घोलप, अनंता भोईर, सागर घोलप, मेघराज घोलप, मयूर घोलप, निलेश घोलप, मनोहर घोलप, अशोक घोलप, संतोष गोल्हे, भाऊ शिद, अनिल रायकर, वैभव मुरबाडे, धसई व्यापारी संघटनेचे संजय बाफना यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा ध्वज खांद्यावर घेतला.

मुरबाड तालुक्यात सेनेची घोडदौड!

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे स्थानिक नेते सुभाष पवार, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे यांच्याकडून मुरबाड तालुक्यात शिवसेनेचे संघटनात्मक जाळे मजबूत केले जात आहे. त्यानुसार भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेत प्रवेश घेतला जात आहे. धसई परिसरात भाजपाचे वर्चस्व होते. तेथील दोन माजी सरपंच, सहकारी सेवा संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.