मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादेत १ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. मात्र औरंगाबाद पोलिसांकडून अद्याप या सभेला अधिकृतपणे कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टांगती तलवार आहे. असे असतानाही सभेसाठी तयार व्हा आणि सभेच्या तयारीला लागा, असा आदेश मनसैनिकांना देणारे राज ठाकरेंच २९ तारखेला मुंबई सोडणार आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या सभेपूर्वी राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतरही ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, आता मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे खरेदीला सुरवात झाली आहे. औरंगाबादच्या सभेसाठी मनसेकडून ५० हून अधिक भोंगे खरेदी करण्यात आले असल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – मनसेची १ मे रोजी औरंगाबादेत सभा; २९, ३० एप्रिलला राज ठाकरे कुठे असणार?)
पुण्यातून ५० पेक्षा अधिक भोंग्यांची खरेदी
पुण्याहून ५० हून अधिक भोंगे औरंगाबादच्या सभेसाठी खरेदी करण्यात आल्याची माहिती मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली. इतकेच नाही औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी १५०० ते १८०० रुपये दराने पुण्यातून ५० पेक्षा अधिक भोंग्यांची खरेदी केली आहे. तसेच हे भोंगे बॅटरीवर चालणारे असून या भोग्यासाठी वीज लागत नसल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर बुधवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक घेणार असून औरंगाबाद पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला पाच दिवस बाकी असताना अद्याप औरंगाबाद पोलिसांनी या सभेसाठी मनसेला परवानगी दिलेली नाही. औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू केल्याचे सांगितले जात होते. या आदेशानंतर सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.
(हेही वाचा- राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
औरंगाबादमध्ये मंगळवारपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आले होते. हे वृत्त चुकीचे असल्याचे औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली. औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे. असे आदेश वर्षभर काढले जात असतात. ही चुकीची माहिती आहे. कलम १४४ अंतर्गत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या आणि शस्त्र बाळगणे यावर आम्ही लक्ष ठेवत असतो, असे निखिल गुप्ता यांनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर सांगितले.
Join Our WhatsApp Community