महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर सडेतोड टीका करत त्यांचा खरपूस समाचार घेतला. कोरोना परिस्थितीत हाताळण्यात केंद्रातील भाजप सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यामुळे 2024च्या निवडणुकीत देशातील जनता मोदी सरकारला धडा शिकवून काँग्रेसच्या हाती सत्ता देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील भजपच्या नेत्यांनाही त्यांनी कानपिचक्या देताना राज्यातील भाजप आता फार काळ टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. राज्यात योग्य वेळ आली की भाजपकडून काँग्रेसमध्ये, मेगा घरवापसी होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
ते जागतिक ‘पप्पू’ झाले आहेत
चीनमध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर जानेवारीमध्ये तो भारतात आला. त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी याबाबत केंद्र सरकारला सावध केले होते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, हा रोग खूप घातक ठरू शकतो, असे त्यांनी वेळोवेळी सांगून सुद्धा मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भाजपकडून थट्टा करण्यात आली, त्यांच्याबद्दल चुकीच्या पोस्ट व्हायरल करुन त्यांना बदनाम केले. पण ज्यांनी हा बदनामीचा डाव मांडला ते आज जागतिक पप्पू झाले आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली.
(हेही वाचाः कालमर्यादा नाही म्हणून १२ सदस्यांची नेमणूक होणारच नाही का? संजय राऊतांचा सवाल )
सत्तेच्या अहंकाराला बंगालमधील जनतेने मूठमाती दिली
देश संकटात असताना, देशातील लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागत असताना, देशाचा मुखिया हा बेहेनजी बेहेनजी करत राज्य जिंकण्यासाठी फिरतो आहे. पण या परिस्थितीत काँग्रेसची भूमिका ही सत्ता मिळवण्याची नाही. काँग्रेसने अनेकदा सत्तेत व सत्तेपासून दूर राहण्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सत्तेची नाही, तर देशाच्या जनतेची सुरक्षितता काँग्रेसला महत्त्वाची वाटते. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले नाही. पण देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करुनही त्यांचे काय झाले, हे जगाने पाहिले आहे. सत्तेचा अहंकार या देशाने पहिल्यांदा पाहिला आणि त्याच अहंकाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न बंगालमधील जनतेने केला.
महाराष्ट्रावरील प्रेम केंद्राने दाखवावे
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केंद्र सरकारतर्फे वादळग्रस्तांना मदत करणे गरजेचे आहे. तौक्ते वादळाचा फटका महाराष्ट्रासह गुजरात व गोवा या राज्यांना बसला. पण तरीही देशाच्या पंतप्रधानांनी केवळ गुजरातचा दौरा केला. महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन सुद्धा त्यांचे हेलिकॉप्टर महाराष्ट्राच्या हद्दीत आले नाही. यावेळी जनतेला मदत करायचे सोडून देशाच्या पंतप्रधानाप्रमाणे जबाबदारीने न वागता, आपण गुजरातचे पंतप्रधान असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेते केंद्राकडून मदत मिळेल असं सांगत आहेत. गुजरातला जर 1 हजार कोटी देण्यात येत आसतील, तर महाराष्ट्राचे या आपत्तीत जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर जर प्रेम असेल, तर केंद्राने 2 हजार कोटींची मदत महाराष्ट्राला द्यावी, अशी काँग्रेसने मागणी केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.
(हेही वाचाः मोंदीच्या गुजरात भेटीवरुन महाराष्ट्रात राजकीय ‘वादळा’ला जोर! संजय राऊत म्हणाले…)
फडणवीसांनी आततायीपणा करू नये
राज्याचे विरोधी पक्षनेते हे सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पहाटेच्या शपथ विधीनंतर त्यांचे संतुलन बिघडले आहे. 80 तासांचं सरकार लपूनछपून बनवत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलंक लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे आता सरकार पाडण्याची भविष्यवाणी करुन, राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा जो प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, तो राज्यासाठी हानिकारक आहे. या कठीण काळात रेमडेसिवीर सारख्या औषधाचं भाजपकडून राजकारण करण्यात आलं. ज्याच्यावर रेमडेसिवीरचा काळाबाजार करण्यासाठी गुजरातमध्ये गुन्हे दाखल झाले, त्याच व्यक्तीला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते रात्रीच्या रात्री वाचवायला जात असतील, तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, याची कितीही निंदा केली तरी ती कमीच आहे. त्यामुळे सामान्य जनतेत त्यांच्याबाबत असंतोष आहे. म्हणून त्यांनी जरा संयम ठेवावा. हे तीन पक्षांचं सरकार सक्षम असून, पाच वर्षात सरकारला कुठलाही धोका नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी असा आततायीपणा करुन त्यांच्याबाबत राज्याच्या जनतेत जी काही थोडीफार चांगली भावना आहे ती धुळीस मिळवू नये, असा खोचक सल्लाही नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
गडकरींना पंतप्रधान करण्याचे भाजपचे प्रयत्न
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ते अपयशी ठरले आहेत, हे स्वतः भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी नितीन गडकरी सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही देशातील कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारचे व्यवस्थापन कमी पडल्याचे सांगितले. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून गडकरी यांच्या उत्तम कामगिरीविषयी अनेक ट्वीट समोर आली, त्यात नरेंद्र मोदी यांचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे भाजपमधील वरिष्ठांकडून मोदींच्या जागी गडकरी यांच्या हातात सत्तेची धुरा द्यावी, अशाप्रकारचे प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे.
(हेही वाचाः राजभवनात भुताटकी, ती ‘भूतं’ कोण?)
2024 साली राहुल गांधीच पंतप्रधान
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही, आता जरी निवडणुका झाल्या तरी देशात भाजप 400 पेक्षा जास्त जागांवर निवडून येईल, अशी भविष्यवाणी केली. त्यातून केंद्रातले मोदी सरकार हे अपयशी ठरले असून, ते बरखास्त करा हाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मोदी नको असतील तर आमच्या महाराष्ट्रातले गडकरी तीन वर्षांसाठी पंतप्रधान झाले, तर आम्हाला नक्कीच आवडेल. यात कुठलेही राजकारण नाही. 2024च्या निवडणुकीत राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान असतील हे आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही नक्कीच सत्यात उतरवू, असे सूतोवाच देखील पटोले यांनी केले.
आता राज्यात भाजप टिकणार नाही
देशात आणि राज्यातील भाजपमध्ये 50 ते 60 टक्के लोक हे काँग्रेसमधील आहेत. राज्यातील भाजपचे अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत. पण आमचे विरोधी मित्र त्यांना सत्तेत परत येण्याची स्वप्न दाखवत, मंत्रीपदाचे आमिष देऊन त्यांना भाजपमध्ये थोपवून ठेवत आहेत. पण त्यांचा हा खेळ फार काळ चालणार नाही. राज्यात भाजप फार काळ टिकणार नाही. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आता भाजप नामोहरम होईल आणि जुन्या भाजपप्रमाणे हम दो, हमारे दो अशी अवस्था भविष्यात भाजपची होणार आहे.
(हेही वाचाः ‘टूलकिट’वर भाजपचे ट्विट! ट्विटरची ‘शेरेबाजी’! पोलिसांची नोटीस!)
लवकरच काँग्रेसमध्ये मेगा घरवापसी
भाजप हा देशाला बरबाद करणारा पक्ष आहे, तो देशाचं कधीही भलं करू शकत नाही. त्यामुळे मी भाजपची खासदारकीची खुर्ची सोडून काँग्रेसमध्ये आलो, कारण काँग्रेस हे माझे घर आहे. त्यामुळे पक्षाने मला जी काही जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडतोय. संघटनात्मक पातळीवर आपण काँग्रेसला अधिक बळकटी देत आहोत. फडणवीसांनी सामान्यांसाठी मेगा नोकरभरती करायचं सोडून, भाजपमध्ये राजकीय मेगा भरती केली. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेल्यांना पश्चात्ताप होत असून, आपली फडणवीसांनी फसवणूक केली आहे, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे अनेक मोठे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच काँग्रेसमध्ये मेगा घरवापसी होईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. पुढचा काळ हा काँग्रेसचा असेल, हे महाराष्ट्राची जनता दाखवून देईल.
Join Our WhatsApp Community