‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळीपर्यंत राबविणार – तानाजी सावंत

167

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळीपर्यंत राबवावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या. मंत्री सावंत यांनी पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव नवीन सोना, आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. नितीन आंबडेकर आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घ्यावे

मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या यंत्रणेला कार्यान्वित करण्याच्या सूचना द्याव्यात. जनजागृती, समुपदेशन तसेच प्रत्यक्ष भेटी यावर पुढील काळात भर देऊन मोहीम यशस्वी करावी. मोहीम फक्त तपासणी वरच न थांबता पुढे गंभीर आजारासंबंधी उपचार आणि त्याकरिता लागणारा खर्च या बाबत रूग्णास सर्वतोपरीने मदत करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ रूग्णास देण्याकरिता यंत्रणा कार्यान्वित करणे, मदत सेल उभा करावा. याच मोहिमेच्या माध्यमातून रूग्णाचे आरोग्य विषयी आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घ्यावे. कोरोना सारखी आपत्ती पुढे आल्यास या हेल्थ डाटाचा उपयोग आपत्ती निवारणासाठी करता येईल शिवाय नवीन मोहीम देखील राबविण्याकरिता याचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. मोहिमेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे, हे या अभियानाचे यश आहे, असे त्यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागांच्या योजनांबाबत यावेळी माहिती दिली. डॉ. साधना तायडे यांनी आभार मानले.

(हेही वाचा जागतिक हृदय दिनीच महापालिकेच्या वरळी हबमध्ये अभियंत्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.