नवनीत राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश

76

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. रविवारी राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, कोठडीत आपल्याला हीन वागणूक देण्यात येत असल्याचे पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. या पत्राची गंभीर दखल घेत आता लोकसभा सचिवालयाकडून राज्य सरकारला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अहवाल सादर करण्याचे निर्देश

आपल्याला चुकीची वागणूक मिळत असल्याचे पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले होते. अनुसूचित जातीचे असल्यामुळे आपल्याला खार पोलिस ठाण्यात रात्रभर पाणी देण्यात आले नाही. असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. या पत्राची दखल घेत आता लोकसभा सचिवालयाकडून राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत. 24 तासांच्या आत या प्रकरणाचा अहवाल लोकसभा सचिवालयाला सुपूर्द करावा, असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन करणा-या १६ शिवसैनिकांना जामीन)

काय होतं राणांचं पत्र

  • आपण अनुसूचित जातीचे असल्यामुळे आपल्याला पोलिस कोठडीत रात्रभर पाणी देण्यात आले नाही.
  • पाणी मागितल्यावर मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
  • आमचा उपक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नव्हता, आम्ही त्यांना हनुमान चालिसा पठणासाठी आमंत्रित केलं होतं.
  • मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा विचारात घेऊन हनुमान चालिसा पठणाचा निर्णय आम्ही मागे घेतला.
  • पण त्यानंतरही मला आणि माझे पती रवी राणा यांना घरात कैद करण्यात आले.

जामीन मिळणार?

दरम्यान राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, सोमवारी राणा दाम्पत्याने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या अर्जावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.