ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये खरी शिवसेना कुणाची यावरुन सुरू असलेला वाद न्यायप्रविष्ट असतानाच आता शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन एक नवा वाद सुरू झाला आहे. एमएमआरडीएने शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. पण यावरुन आता शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवाजी पार्कवरुन सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार पुढे नेल्यास तो बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान होईल, असे म्हणत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
…तर बाळासाहेबांचा अपमान
शिवाजी पार्कच्या मैदानावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार जर कोणी पुढे नेले तर तो शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्या विचारांचा अपमान होईल. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्ववादी विचार जे कोणी पुढे घेऊन जातील त्यांचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हक्क राहील, असे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः शिंदे गटाला परवानगी तर ठाकरेंचा अर्ज फेटाळला, ‘या’ मैदानावर होणार शिंदेंचा ‘दसरा मेळावा’)
परवानगी कुणाला?
दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी कोणाला द्यावी, याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षाच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवर करण्यात येतो. शिंदे गटाला अजून अधिकृतरित्या शिवसेना पक्षाचा दर्जा देण्यात न आल्यामुळे नियमानुसार शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी ही उद्धव ठाकरे गटाला देणे महत्वाचे ठरते. पण शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांकडूनही शिवाजी पार्कसाठी अर्ज करण्यात आल्यामुळे यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community