स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात रोखा आणि हे राज्य कायद्याचे, तसेच सावरकरांचे आहे, हे दाखवून द्या, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल शेवाळे यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अवमानास्पद वक्तव्य केले आहे. ही पहिली वेळ नाही. ते सातत्यपूर्ण अशी वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करतो की, या विधानाची गंभीर दखल घेऊन ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात थांबवावी. राज्यात कायद्याचे राज्य आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे राज्य आहे, हे दाखवून द्यावे, असेही शेवाळे म्हणाले.
राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन करणार
मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला असता बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन केले होते. आज पुन्हा तसे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कारण कॉंग्रेसच्या युवराजांकडून सातत्याने सावरकरांचा अवमान केला जात आहे. त्यामुळे मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की, मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात जसे बाळासाहेब ठाकरेंनी ‘जोडे मारो’ आंदोलन केले होते, त्याप्रमाणे राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन करावे, असे राहुल शेवाळे म्हणाले.
Join Our WhatsApp Community