केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि ठाकरे गटाची याचिका दाखल करून घेतली. मात्र न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच या काळात ठाकरे गटाला व्हीप जारी करणार नसल्याचे आश्वासन शिवसेनेकडून न्यायालयाला देण्यात आले आहे. यावर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसार माध्यमांसोबत बोलताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कुठेही स्थगिती दिलेली नाही. शिवसेना व्हीप लागू करून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवू शकतात, असे ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हणाले. बँक अकाऊंट, मालमत्तेबाबतही त्यांनी मुद्दा मांडला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने आम्हाला आणि त्यांना एक-एक आठवडा दिला आहे. दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.’
पुढे शेवाळे म्हणाले की, ‘दोन आठवड्यात व्हीप जारी केला तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होऊ शकतात, अशी भिती व्यक्त केली होती. त्यावर आमचे वकील महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी सांगितले की, ‘सध्या आम्ही व्हीप जारी करण्याच्या विचारात नाही.’ कारण ती प्रक्रिया चालू झालेली नाही. परंतु पक्षांतर्गत प्रक्रियेचा हा विषय आहे. पक्षांतर्गत प्रक्रिया जर कोणी अवलंबली नाही, तर निवडणुक आयोगाच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते. निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निर्णयाबाबत जो निकाल दिला आहे, त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. त्यावर आम्ही काहीही हस्तक्षेप करणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.’
(हेही वाचा – ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली, मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार)
Join Our WhatsApp Community