‘…तर आम्हीही ठाकरे गटाचं दसरा मेळावा घेण्यासाठी स्वागत करू’, शिंदे गटाचे आवाहन

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात नव्या वादाला तोंड फुटले आहे. याबाबत आता कोणाला परवानगी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दोन्ही गटांकडून आपल्यालाच परवानगी मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत आता ठाकरे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जर महाविकास आघाडीतून बाहेर पडत उद्धव ठाकरे गटाने आपली हिंदुत्ववादी भूमिका स्पष्ट केली तर आम्ही दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी त्यांचं स्वागत करू, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.

शिंदे गट हिंदुत्ववादी विचारांचा

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात वर्षानुवर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जातं. शिंदे गट हा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या आधारावर स्थापन झालेला आहे. तर उद्धव ठाकरे गट हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे पक्षाची परंपरा पुढे नेण्याचं काम शिंदे गट करत आहे. त्यामुळे महापालिकेसमोर देखील हा मोठा प्रश्न आहे.

तसेच खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा आजही सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे मुंबई महापालिकेने याबाबत न्यायिक सल्ला मागितला आहे. पण मुंबई महापालिका याबाबत योग्य तो निर्णय घेईल यात काहीच शंका नाही, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

हिंदुत्ववादी भूमिका स्पष्ट करावी

उद्धव ठाकरे गटाने जर का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडली आणि महाविकास आघाडीतून जर बाहेर पडले तर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून त्यांनी हिंदुत्ववादी विचारांची भूमिका स्पष्ट केली तर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी जनता सुद्धा त्यांना पाठिंबा देईल, असे मतही खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here