शेवाळेंचे समर्थक अजूनही उध्दव आणि आदित्य ठाकरेंसोबतच

130

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब शिवसेना गटात प्रवेश करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची साथ सोडली. परंतु शेवाळे शिंदे गटाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत सहभागी झाले असले, तरी शेवाळेंचे सच्चे मित्र म्हणून ओळखले जाणारे शिवसेना विधानसभा समन्वयक निमिष भोसले, शेखर चव्हाण आदींसह काही शिवसेना पदाधिकारी मंडळी ही उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहिलेली आहेत. त्यामुळे शेवाळेंच्या शिंदे गटातील प्रवेशानंतरही त्यांच्यासोबत जाण्यास त्यांचे मित्र मात्र तयार नसल्याची चर्चा शिवसेनेत ऐकायला मिळत आहे.

शेवाळे मुंबईत

शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे दोन गट तयार होऊन पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांपाठोपाठ 12 खासदारही गेल्याने या खासदारांच्या गटाचे लोकसभेतील गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची निवड केली गेली आहे. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतच असलेल्या शेवाळेंचे शनिवारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ, चैत्यभूमी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली.

(हेही वाचाः ठाकरे कुटुंबातील खरे शिवसैनिक शिंदे गटात येणार – राहुल शेवाळे)

शेवाळेंच्या समर्थकांनी दिली ठाकरेंना ग्वाही

शेवाळेंनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर दक्षिण मध्य मुंबईच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला सर्वच पदाधिकारी उपस्थित राहिले. यामध्ये शेवाळेंचे कट्टर समर्थक व मित्र असलेल्या निमिष भोसले, शेखर चव्हाण आदींवर शिवसेनेची करडी नजर होती. परंतु त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढत आम्ही आपल्यासोबतच असल्याची ग्वाही विभागप्रमुख मंगेश सातमकर यांच्या उपस्थितीत दिली.

दक्षिण मुंबईतील किती पदाधिकारी शिंदेंसोबत?

दरम्यान, शेवाळेंना लोकसभेचे गटनेते बनवल्यानंतर तसेच शिंदे गटात इतर विभागप्रमुख, नेते मंडळी सामील होत असताना ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. परंतु शेवाळेंचे मित्र असलेले निमिष भोसले आणि शेखर चव्हाण हे उध्दव व आदित्य ठाकरे यांच्यासोबतच पक्षात राहणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

(हेही वाचाः ‘आनंद दिघेंबाबत जे झालं त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार!’ मुख्यमंत्र्यांचा इशारा)

राहुल शेवाळेंचे मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांच्यासोबत माजी नगरसेविका वैशाली शेवाळे, काही शाखाप्रमुख तसेच इतर पदाधिकारी दिसले. परंतु त्यांच्या समर्थक मित्रांसह अनिल पाटणकर व इतर पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याच्या मनस्थितीत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेवाळेंचे मुंबईत आगमन झाल्यानंतर या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील किती पदाधिकारी शिंदे गटात सामील होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.