शिवसेनेचे ‘संजय’ राष्ट्रवादीला बुडवणार!

परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे सध्या त्यांच्या एका व्हिडिओमुळे जोरदार चर्चेत आले आहेत.

92

महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी आणि आता ते टिकवण्यासाठी शिवसेना संजय राऊत हे जिवाचे रान करत असताना शिवसेनेचे दुसरे संजय मात्र महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पाडण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे हे दुसरे संजयही शिवसेनेचे खासदार आहेत. सध्या या संजयमुळे राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले असून, यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे सध्या त्यांच्या एका व्हिडिओमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. संजय जाधव यांनी थेट राष्ट्रवादी बुडवण्याची भाषा केल्याने आता याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले संजय जाधव?

जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलो. काल फक्त कलेक्टर बदलायचा होता, मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवलं जसे काही मोठा अपराध केला. आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात कुठंपर्यंत शांत बसायचं आहे, कुठंपर्यंत सहन करायचं आहे, असे संजय जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

(हेही वाचा : पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प एसआरए घेणार ताब्यात!)

भुजबळांचा बाप काढला

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे छगन भुजबळ यांचा बापही जाधव यांनी भाषणा दरम्यान काढला. एका प्रकरणात आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली…कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले, दुकानदाराला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा…एवढं असतानाही भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं सांगितलं…जसं काय याच्या बापाची जहागिरीच आहे, असा एकेरी हल्ला त्यांनी भुजबळांवर चढवला. आम्ही आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलो. परभणी जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जसा मी काय मोठा अपराधच केलाय…. तुमचं सगळं जमतं…. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून…अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जो काही आदेश येईल तो मान्य केला. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरु आहे, अशी टिका देखील त्यांनी केली.

याआधी संजय जाधवांनी दिला होता राजीनामा

गेल्या वर्षी देखील आक्रमक झालेल्या संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी राजीनाम्यासोबतच एक पत्रदेखील पाठवले होते. या पत्रात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप केला होता. स्थानिक शिवसैनिकांच्या इच्छा आपण पूर्ण करु शकत नसलो, आपल्या कार्यकर्त्यांना योग्यपणे न्याय देता येत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.