राणा दाम्पत्याला झालेली अटक, अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांबाबत केलेली आक्षेपार्ह पोस्ट, गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यामुळे हे अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू असून, हे सर्व लवकरात लवकर थांबवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन सर्व पक्षांमध्ये मध्यस्थी करायला तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हे कुठेतरी थांबायला हवं
सुप्रिया सुळे या मंगळवारपासून जालना जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील विविधा मुद्द्यांवर भाष्य केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. त्यामुळे राज्यात हे खूप घाणेरड्या पातळीचे राजकारण सध्या सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे कुठेतरी थांबायला हवं. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी बोलायला तयार आहे, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
(हेही वाचाः ‘तर मी हात तोडून हातात देईन’,सुप्रिया सुळेंना का झाला संताप अनावर?)
तिघांचेही आभार
केतकी चितळे हिने केलेल्या पोस्टनंतर आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिचा निषेध व्यक्त केला. यासाठी मी त्या तिघांचेही आभार मानले होते. पण आता हे सगळं कुठेतरी थांबायला हवे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community