पुन्हा अंडे, दिघावकर यांची बदली : पाच सहायक आयुक्तांची खांदेपालट

184

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करता यावे म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येत असून हे अभियान पूर्णत्वास नेण्यासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक  विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ला झोकून घेतले आहे. मात्र, या अभियानाच्या पूर्वसंध्येलाच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पाच सहायक आयुक्तांच्या बदल्या करत खांदेपालट केली. यामध्ये किरण दिघावकर आणि मृदुला अंडे यांची पुन्ही एकदा बदली करण्यात आली आहे. किरणे दिघावकर यांची सव्वा महिन्यात तिसऱ्यांदा आणि अंडे यांची एका महिन्यात तिसऱ्यांदा बदलीचे आदेश काढून आयुक्तांनी आपल्या प्रशासनातील भोंगळ कारभाराचे दर्शन घडवले आहे.

शिंदे सरकार येताच दिघावकरांची उचलबांगडी केलेली 

माहिम-दादरचे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी म्हाडाच्या निधीतून बनवलेल्या भागोजी किर स्मशानभूमीतील धर्मशाळेचे वाढीव बांधकाम तत्कालिन जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त असलेल्या किरण दिघावकर यांनी पाडल्याने याबाबत सरवणकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यात शिंदे सरकार येताच ४ जुलै २०२२ रोजी दिघावकर यांची उचलबांगडी करून त्यांची नियुक्ती भायखळा ई विभागात केली होती. त्यामुळे ई विभागात दिघावकर रमत नसल्याने त्यांची पुन्हा बदली होईल अशा शक्यता वर्तवली जात असताच  १२ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची बदली पी उत्तर विभागात केली. म्हणजे अवघ्या सव्वा महिन्यांत दिघावकर यांची दुसऱ्यांदा बदली झाली.

(हेही वाचा वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे बळी ठरले विनायक मेटे?)

अंडे यांची पहिली बदली १४ जुलै २०२२ रोजी झालेली

तर २९ जुलै २०२२ रोजी घाटकोपर एन विभागातून चेंबूर एम पश्चिम विभागाच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आलेल्या मृदुला अंडे यांची पुन्हा १५ दिवसांमध्येच अतिक्रमण निर्मूलन विभागात केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागात सहायक आयुक्तांची तीन पदे असून या तिन्ही सहायक आयुक्तपदाचा भार अंडे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. अंडे यांची पहिली बदली १४ जुलै २०२२ रोजी झाली होती. दहिसर आर उत्तर विभागातून त्यांची बदली घाटकोपर एन विभागात केली होती. परंतु अवघ्या १५ दिवसांमध्ये अंडे यांची घाटकोपरमधून चेंबूर एम पश्चिम विभागात बदली केली होती. त्यामुळे एक महिन्यात तिसऱ्यांदा बदली करत आयुक्त हे अंडे यांना वॉर्डांची भटकंती करायला लावत आहेत का, असा प्रश्न पडू लागला आहे.

महेश पाटील यांची ई विभागातून बदली करण्यात आली

तर मालाड येथील पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील (मकरंद दगडखैर) यांची कोविड काळात ई विभागातून याठिकाणी बदली करण्यात आली होती. परंतु त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच आयुक्तांनी त्यांना पश्चिम उपनगरातून शहरात आणत दादर पूर्व, शिवडी, परळ, लालबाग आदी भाग असलेल्या एफ दक्षिण विभागात केली आहे. तर ई विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली करण्यात आल्याने या रिक्तपदी परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार यादव यांच्याकडे या विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

(हेही वाचा वीर सावरकरांच्या छायाचित्राला विरोध; SDPI च्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल)

या सर्वांना १२ ऑगस्टपासूनच पदभार स्वीकारण्याचे आदेश बजावण्यात आले असून एका बाजुला भारताचा स्वतंत्र्य महोत्सवी वर्ष साजरे करता यावे म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हे अभियान राबवले जात आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी हे सर्व सहायक आयुक्त आपल्या विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांसह मेहनत घेत होते. परंतु या अभियानाच्या कालावधीतच त्यांना दुसऱ्या वॉर्डात पाठवून एकप्रकारे आयुक्तांनी आपली प्रशासनावरील पकड पोकळ असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे १५ ऑगस्टला नवीन विभागात त्यांना जावून काम करावे लागणार असून याच बदल्या १५ ऑगस्ट नंतरही काढता येण्यासारखे होते, असेही कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे.

बदली करण्यात आलेले सहायक आयुक्त व त्यांचे वॉर्ड

  • ई विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, बदलीचे ठिकाण : पी-उत्तर
  • एफ- दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर : बदलीचे ठिकाण ए विभाग
  • एम -पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त मृदुला अंडे : बदलीचे ठिकाण अतिक्रमण निर्मुलन-शहर, प.उ आणि पू.उ
  • पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील: बदलीचे ठिकाण एफ-दक्षिण विभाग
  • कार्यकारी अभियंता परिवहन विभाग अजयकुमार यादव : बदलीचे ठिकाण ई विभाग सहायक आयुक्तपदी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.