महाराष्ट्र बंद: एसटी सुरू, पण ‘बेस्ट’ बंद

बेस्ट बसेस रस्त्यावर नसल्याने बंद यशस्वी झाल्याचे चित्र रंगवण्यास सुरुवात झाली आहे.

113

सोमवारी राज्यात महाराष्ट्र बंदच्या दिवशी मुंबईतील बेस्ट बसेस बंद ठेऊन एसटी बसेस सुरु ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे बेस्ट आणि एसटी बसेस दोन्ही तोट्यात असून, त्यांना पुन्हा नफ्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे.

परंतु महाराष्ट्र बंदच्या दिवशी एसटी बसेस सुरु ठेऊन, सरकारमधील घटक पक्षाने आधीच तोट्यात असलेल्या बेस्टच्या बसेस रस्त्यावर उतरू न देण्याची रणनीती आखत उपक्रमाला अधिक खड्ड्यात घालण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः बेस्ट महाव्यवस्थापक आणि आगार प्रमुखांना मेस्मा लागणार का?)

बंद यशस्वी झाल्याचे चित्र

महाराष्ट्र बंदच्या दिवशी सर्व आगारांमध्ये कर्मचारी वर्ग हजर असतानाही अत्यावश्यक सेवा असलेल्या बेस्ट बसेस चालवण्यात आल्या नाहीत. सर्व आगारांमध्ये एकही बस बाहेर येणार नाही याची विशेष काळजी घेत महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने बस आगारातच उभ्या करून ठेवल्या. परिणामी लोकांची प्रचंड गैरसोय झाली. परंतु बेस्ट बसेस रस्त्यावर नसल्याने बंद यशस्वी झाल्याचे चित्र रंगवण्यास सुरुवात झाली आहे.

१०० टक्के ‘बेस्ट’ बंद

बेस्ट समिती ही शिवसेना पक्षाकडे असून त्यांनी आपल्या बळाचा वापर करत महाराष्ट्र बंदच्या दिवशी बेस्ट बसेस रस्त्यावर आणल्या नाहीत. परंतु सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बसेस मात्र सुरु होत्या. राज्यभरात नियोजित १८ हजार ९४७ एसटी बसेसच्या फेऱ्या होत्या. त्यातील प्रत्यक्षात सुटलेल्या फेऱ्यांची संख्या ही १६ हजार ६२ एवढी आहे. त्यामुळे केवळ २ हजार ८५५ फेऱ्याच रद्द कराव्या लागल्या होत्या. हे प्रमाण एकूण एसटी बसेसच्या तुलनेत केवळ १५ टक्के होते. तर यातुलनेत बेस्ट बसेस १०० टक्के बंद होत्या.

(हेही वाचाः आज ‘महाराष्ट्र बंद’… मग वसुलीचं काय?)

एसटीचा फायदा

यामध्ये एसटीकडून मुंबईतून केवळ ८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एकूण १९२ फेऱ्या होतात, त्या तुलनेत १८४ फेऱ्या सोमवारी सुरु होत्या. एकीकडे एसटी बसेस मुंबईत पूर्णपणे सुरु ठेवलेल्या असताना, बेस्ट बसेस मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या. संध्याकाळी पावणे सात वाजता बेस्टच्या १८०० बसेस सुरू करण्यात आल्या. पण बंदमुळे दिवसभरात जे काही नुकसान होईल ते बेस्टचे होऊ द्या आणि फायदा होईल तो एसटीचा, असाच पावित्रा सरकारचा असल्याचे दिसून आले. कोविड काळात बेस्ट बसेसची संख्या कमी करुन एसटी बसेसची संख्या मुंबईत वाढवण्यात आली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला याचा फायदा झाला.

(हेही वाचाः महाराष्ट्र बंद : ‘बेस्ट’च्या बसगाड्या आगारातच फोडल्या?)

एकीकडे एसटी सेवा सुरु ठेऊन सरकारने आपल्याला नामानिराळे ठेवतानाच, महामंडळाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. तर दुसरीकडे आपल्याच पक्षाची सत्ता असल्याने बेस्ट बसेस बंद ठेऊन त्यांना खड्ड्यात घालताना, बंद यशस्वी करुन घेतल्याच्या प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.