गरज सरो, एसटी मरो!

एरव्ही गरजेच्या वेळी राबराब राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर गरज सरो आणि एसटी मरो, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

104

तुमची आमची हक्काची अशी लालपरी. संकट कोणतेही असो ही लालपरी सर्वांच्या सेवेसाठी नेहमीच हजर असते. कोरोना संकटाच्या काळात देखील जिथे सर्व काही ठप्प होते, त्यावेळी लालपरी मात्र मुंबईच्या रस्त्यांवर धावत होती. मात्र या लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला नेहमीच दु:ख आले आहे.

कधी वेतनासाठी त्यांना वाट बघावी लागते, तर कधी हक्काच्या बोनससाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. कोरोना काळात तर त्यांना लसीसाठी देखील झगडावे लागत होते. जिथे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्यात आणि देशात लसीकरण सुरू होते, तिथे आपल्या जीवाची पर्वा न बाळगता सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मात्र लसीपासून दुर्लक्षित ठेवले जात होते. त्यामुळे एरव्ही गरजेच्या वेळी राबराब राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर गरज सरो आणि एसटी मरो, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा नाही

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे नर्सेस, डॉक्टर्स यांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दिला जात असताना, एसटी कर्मचारी मात्र यापासून वंचित होते. कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. मात्र महामंडळाकडून माहितीच्या अधिकारात दिलेली बातमी धक्कादायक आहे. गणेश शेंडगे हे फुलसावंगी दवाखान्यात लस घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी गेले होते. मात्र, त्यावेळी त्यांना रुग्णालयात लस देण्यास नकार दिला. तसेच तुम्ही अत्यावश्यक सेवेत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोर्टलवर तक्रार केली. त्यांच्या तक्रारीचे उत्तर नुकतेच महामंडळाने दिले असून, यामध्ये महामंडळाने म्हटले आहे की, महामंडळामधील कर्मचारी हा अत्यावश्यक सेवा अधिनियमन १९५५ च्या अंतर्गत येत नाही.

(हेही वाचाः एसटीच्या निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना लवकरच मिळणार थकीत देणी!)

आंदोलन करायचे असल्यास एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतो म्हणून महामंडळ परिपत्रक काढते. तसेच न्यायालयात जाऊन मनाई आदेश आणते. अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलत हवी असल्यास तुम्ही अत्यावश्यक सेवेत येत नाही असे महामंडळ म्हणते, हा दुटप्पीपणा आहे.

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.