एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, म्हणून त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या त्रिसदस्यीय समितीने 12 आठवड्यानंतर निर्णय दिला. समितीने दिलेल्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी सही करुन मंजूरी दिली. या अहवालानुसार, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही. त्यामुळे एसटीच्या संपकरी कर्मचा-यांना पुन्हा एकदा आवाहन आहे की, त्यांनी कामावर रुजू व्हावे आणि एसटी पुन्हा सुरळीत सुरू व्हावी, कारण एसटी ही सर्वसामान्यांची जननी आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
विलीनीकरण नाहीच
त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यात आर्थिक बाबी शामील असल्याने, न्यायालयाने हा अहवाल कॅबिनेट मंत्र्यांसमोर ठेवायला सांगितला. त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांच्या निर्णायानंतर तो सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. या अहवालात एसटी कर्मचा-यांची राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची असणारी मूळ मागणी समितीने फेटाळून लावल्याचे, अनिल परब यांनी सांगितले. प्रशासकीय बाबी, आर्थिक बाबी आणि कायदेशीर बाबी या सर्व बाबींचा व्यवस्थित अभ्यास करुन, त्यांनी आपलं मत सांगितलं आहे. महामंडळातून राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण होणार नाही, हे सांगण्यात आले आहे.
सरकारने पगार वाढ दिलीय
एसटी जोपर्यंत पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत महामंडळाने एसटीला मदत केली पाहिजे असं नमूद करण्यात आलं. विलीनीकरण अशक्य असल्याने, राज्य सरकारने संप चालू असतानाच, कर्मचा-यांच्या वेतनात वाढ केली होती. ज्यांना 1 ते 10 वर्ष झाली आहेत, त्यांच्या मूळ पगारात 5 हजार रुपये, 10 ते 20 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचा-यांच्या पगारात 4 हजार रुपये आणि 20 वर्षाच्या पुढे ज्यांची सर्विस आहे. त्यांच्या पगारात अडीच हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
( हेही वाचा: जाणून घ्या…भारत विरुद्ध श्रीलंकामध्ये होणा-या टेस्टची काय आहेत तीन वैशिष्ट्ये? )
…म्हणून कारवाया मागे
विलीनीकरण शक्य नसल्याचे, समिताच्या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी आज पुन्हा एकदा संप करणा-या कर्माचा-यांना आवाहन करतो की, त्यांनी शक्य तितक्या लवकर कामावर पुन्हा रुजू व्हावे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. जे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत, त्यांनी कायदेशीर मार्गाने पुन्हा कामावर रुजू व्हावे. सरकारची जनतेशीही बांधिलकी आहे. या एसटी संपामुळे एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सामान्य जनेतेचे हाल झाले आहेत. त्यामुळे आम्ही संपकरी एसटी कर्मचा-यांवर केलेल्या कारवायासुद्दा मागे घेत असल्याचे, अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
Join Our WhatsApp Community