लालफितीत अडकला ‘लालपरी’च्या कर्मचा-यांचा पगार

आधीच कमी पगार, त्यात पगार वेळेत न मिळाल्याने घर कसे चालवायचे, असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांना पडू लागला आहे.

आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्यशासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी नुकतीच केली होती. मात्र हे ६०० कोटी अजूनही सरकारच्या लालफितीत अडकल्याने, 7 तारखेला होणारे एसटी कर्मचा-यांचे वेतन १५ तारीख उजाडली तरी झालेले नाही. त्यामुळे गेले ६०० कोटी कुणीकडे, असे म्हणण्याची वेळ आता एसटी कर्मचाऱ्यांवर आलेली आहे.

आधीच पगार कमी त्यात वेळेतही मिळेना

महामंडळातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन दिले जाते. मात्र मे २०२१चे वेतन अजूनही देण्यात आलेले नाही. यासाठी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे पुढील सहा महिन्यांच्या वेतनासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी एसटी महामंडळाकडून ६०० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता १५ तारीख उजाडली तरी देखील हा निधी वितरीत न झाल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पडत आहे. आधीच कमी पगार, त्यात पगार वेळेत न मिळाल्याने घर कसे चालवायचे, असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांना पडू लागला आहे.

(हेही वाचाः सरकारच्या मदतीनेच पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन! )

निधी वर्ग तरी कधी होणार?

गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवणे देखील एसटीला शक्य नव्हते. यासाठी मंत्री परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचा-यांचे वेतन व इतर दैनंदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्री यांनी मान्य केले होते. मात्र हे ६०० कोटी अजूनही महामंडळाकडे वर्ग झालेले नाहीत.

एकतर एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. त्यात एक दिवस जरी वेतन उशिरा मिळाले तरी कर्मचाऱ्यांच्या संसाराचे बजेट कोलमडून जाते. त्यामुळे शासनाने दिलेल्या निधीची रक्कम तात्काळ एसटीकडे वर्ग करावी.

-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here