रावतेंची ‘शिवाई’ परबांच्या काळात भंगारात

ही बस उद्घाटनाच्या दिवशी दिसली त्यानंतर पुन्हा तिचे दर्शन झाले नाही.

128

दिवाकर रावते… शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री. माजी परिवहन मंत्री असलेल्या दिवाकर रावते यांनी फडणवीस सरकारच्या काळात एसटीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मग एसटी कर्मचाऱ्यांचा बोनसचा चिघळलेला विषय असो, वा इतर विषय असो. दिवाकर रावते यांच्या अशा एका निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे. परिवहन मंत्री असताना दिवाकर रावते यांनी एसटीच्या ताफ्यात पहिली विजेवर चालणारी एसटी आणली. याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, ही बस उद्घाटनाच्या दिवशी दिसली त्यानंतर पुन्हा तिचे दर्शन झाले नाही. त्यामुळे रावतेंची “शिवाई” परबांच्या काळात मात्र भंगारातच असल्याची चर्चा मात्र आता एसटी महामंडळात सुरू आहे.

(हेही वाचाः सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजपचा ‘लोकल’ प्रवास!)

रावतेंची ‘ती’ एसटी कागदावरच

माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात लोकार्पण झालेली ती बस, आता ठाकरे सरकार येऊन दीड वर्ष झाले तरी अजूनही ती बस कागदावरच आहे. अनेक अटी असल्याने कंत्राटदार तयार नव्हते. त्यानंतर त्याच्या अटी महामंडळाने बदलून दिल्या. या एसटी बनवण्याचे कंत्राट मित्रा मोबिलीटी या कंपनीला देण्यात आले. मात्र या कंपनीने अद्यापही गाड्या पुरवलेल्या नाहीत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना ज्या बसचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले, ती शिवाई बस मुख्यमंत्री झाल्यानंतरही लोकांच्या सेवेत आलेली नाही. त्यामुळे रावतेंची शिवाई परबांच्या काळातही कागदावरच आहे. दरम्यान याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी मित्रा मोबिलीटी कंपनीने अजूनही गाड्या पुरवलेल्या नाहीत. त्यांच्याशी आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. तरी देखील ती कंपनी गाड्या पुरवत नसल्याने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे विभागातील अधिका-यांनी सांगितले.

(हेही वाचाः म्हणून भाजपच्या मनात ‘मन’से!)

शिवाई बसचे उद्घाटन माझ्या काळात झाले होते. त्याचे टेंडरही पूर्ण झाले. पण त्याचे पुढे काय झाले ते माहीत नाही.

-दिवाकर रावते, माजी परिवहन मंत्री

प्रदूषण रोखण्यासाठी घेतला निर्णय

इंधन दरवाढीचा मोठा फटका एसटीला बसत आहे. इंधनावरील खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, यावर उपाय म्हणून एसटीने वीजेवर चालणा-या इलेक्ट्रिक एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिली इलेक्ट्रिक बस एसटीने खरेदी केली. त्यानंतर अशा १५० बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र आता खुद्द उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सरकार आले असतानाही, हा प्रकल्प पुढे जाऊ शकलेला नाही.

या बसचे वैशिष्ट्य काय?

४४ प्रवासी क्षमता असलेली इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असून, एकदा बस चार्ज केली की ती ३०० किमीपर्यंत धाव घेऊ शकेल. तर बस चार्ज होण्यासाठी १ ते ५ तासांचा कालावधी लागणार आहे. या बसमुळे खर्च कमी होणार आहेच, पण आणखी महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे प्रदूषण होणार नाही. सीसीटीव्ही, व्हीटीएस, आरामदायी आसने, प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी उद्घोषणा यंत्रणा असे शिवाईचे वैशिष्ट्य आहे.

(हेही वाचाः खेलरत्न पुरस्कारावरून काँग्रेसचा रडीचा ‘डाव’! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.