राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा सत्र न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता कोल्हापूर, पुणे किंवा बीड पोलीस सदावर्तेंचा ताबा घेणार असल्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी देखील सदावर्तेंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईत चार दिवस कोठडीत
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या अटकेत आहेत. सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपामुळे सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेतले होते. यापूर्वी मुंबईत ते चार दिवस एसटी आंदोलनाप्रकरणी पोलीस कोठडीत होते.
(हेही वाचा – सहा महिन्यांपासून गुणरत्न सदावर्तेंच्या घरी बैठका, पोलीस तपास सुरू)
सातारा पोलिसांकडून कोठडीची मागणी
सातारा पोलिसांनी सदावर्तें यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. ती नामंजूर करुन सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आता मुंबईला आणण्यात येणार असून ऑर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. परंतु त्यांचा ताबा कोल्हापूर, पुणे आणि बीड पोलिसांनी मागितला होता. त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community