एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण तसेच अन्य मागण्यांना घेऊन आंदोलन सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदान हे या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले आहे. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी 21 नोव्हेंबर रोजी अनोखे आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी आपापल्या मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरु करुन रात्रीच्या अंधारातदेखील आमचा लढा चालू असल्याचा संदेश दिला.
रात्रीच्या अंधारात आझाद मैदान प्रकाशमय
आंदोलनाला बसलेल्यांमध्ये पुरुष तसेच महिला कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. मागील अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विरोधी पक्ष भाजपचा पाठिंबा असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत आझाद मैदानात कर्मचाऱ्यांसोबत मागील अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत. आज या कर्मचाऱ्यांनी एक अनोखे आंदोलन केले. त्यांनी रात्रीच्या अंधारात मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरु केले. या प्रकाशामुळे आझाद मैदानावरील शेकडो एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
महाराष्ट्राला हे चांदणं दिसू द्या
यावेळी सदाभाऊ खोत आंदोलकांना मार्गदर्शन करत होते. सर्वांनी किमान दहा मिनिटे फ्लॅशलाईट सुरु करा असे आवाहन खोत करत होते. तसेच आझाद मैदानावर हे चांदणं फुललं आहे. हे चांदणं समस्त महाराष्ट्राला दिसू द्या, असे ते कर्मचाऱ्यांना सांगत होते.