एसटी कामगारांची माथी भडकावून पवारांच्या घरावर हल्ला, कामगार संघटनांचा आरोप

142

राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांनी ८ एप्रिल रोजी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर हल्लाबोल केला. याचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले. सरकारने तातडीने हल्लेखोर कामगारांवर कारवाई केली, तसेच कामगारांचे नेतृत्व करणारे वकील सदावर्ते यांना अटक केली. हा हल्ला निषेधार्ह आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटल्या, तर कामगारांची दिशाभूल करून त्यांना भडकवणारे वकील सदावर्ते यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

कामगारांची दिशाभूल केली

या हल्ल्यानंतर महविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांनी पवारांच्या घरी धाव घेतली होती. एसटी कामगार नेते बरगे यांनीही पवार यांची भेट घेतली. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सुस्पष्ट व सकारात्मक असल्याने तसेच या निर्णयापूर्वीच सरकारने एक मागणी वगळता इतर सर्व मागण्या मान्य केल्याने त्या दोघांच्या निर्णयाचा आदर राखत लवकरच सर्व एसटी कर्मचारी आपल्या कामावर रुजू होतील, अशी अपेक्षा आहे, मात्र कामगारांची दिशाभूल केली जात आहे. भविष्यात एसटीचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने पालकत्वाची भूमिका स्वीकारावी आणि कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या सुद्धा तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी बरगे यांनी या वेळी केली.

कामगार संघटनांच्या मागण्या

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलेली सुधारित वेतन वाढ ही सर्व कर्मचाऱ्यांना सारखी नसून, त्यामधील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. त्या परिवहन मंत्री अनिल परब नक्की दूर करतील, कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय संरक्षण देण्याच्या दृष्टीने “मेडिक्लेम” योजना त्वरित अमलात आणावी. अशी देखील मागणी कामगार संघटनांनी केली. एसटीच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक निधीची तरतूद प्रत्येक अर्थसंकल्पात करणे गरजेचे आहे, असेही बरगे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.