रडगाणे सुरुच… एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा मिळणार ‘थांबा’?

सप्टेंबरच्या वेतनासाठी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

73

मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा वेळेत न होणारा पगार यामुळे लालपरीचे कर्मचारी हतबल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा जुलै महिन्याचा पगार तर चक्क सप्टेंबरमध्ये मिळाला होता. यामुळे निराश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केल्याचे समोर आले होते. मात्र यातूनही महामंडळाने धडा घेतलेला नसून, आता सप्टेंबर महिन्याचे वेतन देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नसल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला!)

म्हणून वेतन रखडणार?

सप्टेंबर महिन्याचे वेतन देण्यासाठी महामंडळाकडे निधी नाही, त्यामुळे पुन्हा एकदा वेतन रखडण्याची दाट शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन रखडले होते, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५०० कोटी रुपये दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा सप्टेंबरच्या वेतनासाठी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

(हेही वाचाः आर्थिक कचाट्यात सापडलेल्या एसटीचे विलीनीकरण करा… संघटनेची मागणी)

अजित दादांच्या अध्यक्षतेखाली समिती

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

एसटी महामंडळाने सरकारकडे आतापासूनच वेतनासाठी पैसे मागितले पाहिजेत. महामंडळ सरकारकडे उशिरा वेतनासाठी पैसे मागते आणि त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो.

 

-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.