एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून जळगावात भाजपला गळती लागली आहे. बुधवारी, २६ मे रोजी मुक्ताईनगरमधील भाजपच्या आजीमाजी नगरसेवकांनी भाजपाला सोडचिट्टी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधून घेतले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला.
मुक्ताईनगरमधील भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांचा यात समावेश आहे. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य ४ जणांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. एकेकाळी राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये अडगळीत पडले होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेत खडसे यांनी भाजपला एकामागे एक धक्के देण्याची प्रक्रिया राबवल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा : लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का? भाजपचा सवाल)
जळगावात शिवसेनेचा महापौर
जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी ३८ मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी ४५ मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना २८ मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.
Join Our WhatsApp Community