राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय बुलेट ट्रेनचे काम सुरु कराल, तर याद राखा!

याआधीही मनसेने बुलेट ट्रेनची कामे बंद पाडली होती आणि आताही जर राज ठाकरे यांची परवानगी न घेता काम सुरु केले, तर बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

समृद्धी महामार्गासाठी ठाण्यातील जमीन हस्तांतरासाठीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने मंजूर केला. त्यामुळे दीड वर्षांपासून रखडलेला जमीन हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागणार आहे, मात्र हा निर्णय घेताना मनसेला विचारात का घेतले नाही? या प्रकल्पाला मनसेचा आधीही विरोध होता आणि आजही आहे, असे असताना मनसेची भूमिका जाणून न घेता हा प्रकल्प राबवणार असाल, तर ठाण्यात बुलेट ट्रेनसाठी एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.

आधी राज ठाकरेंची परवानगी घ्या! 

मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुलेट ट्रनेच्या जागा हस्तांतरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला मनसेकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. आम्ही काम करुन देणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. याआधीही मनसेने बुलेट ट्रेनची कामे बंद पाडली होती. जर राज ठाकरे यांची परवानगी न घेता हे काम सुरु केले, तर एकही वीट रचू देणार नाही, असा इशाराच अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे पालिका क्षेत्रातील शिळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३ हजार ८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे.

(हेही वाचा : अहमदाबाद बुलेट ट्रेनला हिरवा कंदील नाही! अजित पवारांच्या भूमिकेने संभ्रम)

महाविकास आघाडीतही मतभेद! 

बुलेट ट्रेनसाठी जमीन हस्तांतराच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही टीका केली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला जमीन देण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला असेल, तर तो शिवसेनेचा अधिकार आहे. या बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध नव्हताच, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला होता. मनसेनेही विरोध केला होता. कारण मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार आहे, आमचे मत मुंबई-दिल्ली मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करावी, अशी होती, त्यामुळे मुंबईला अधिक फायदा होणार आहे. महाविकास आघाडीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला हिरवा कंदील दिला नाही, तशी चर्चाही झाली नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्यामुळे या प्रकरणी महाविकास आघाडीतील आणखी नवीन मतभेदाचे प्रकरण समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here