बहुतांश मजूर संस्थांवर अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे, कारवाई माझ्यावरच का? दरेकरांचा सवाल

136
मजूर म्हणून मुंबै बँकेत निवडणूक लढवली म्हणून गुन्हा दाखल होऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे. या विषयाला दरेकर यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या २०७ अन्वये प्रस्तावाच्या वेळी बोलताना राज्यभरातील मजूर संस्थांच्या अध्यक्षांची यादी जाहीर केली, त्यामध्ये बहुतांश संस्थांचे अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत, असे असताना कारवाई केवळ माझ्यावरच का होते, याही अध्यक्षांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.

माझ्यावर कारवाई सूडबुद्धीने

१९८० पर्यंत राज्यात १०० पेक्षा अधिक साखर कारखाने, शेती, कुक्कुटपालन संस्था उभ्या राहिल्या, देशातील ४०-४५ टक्के सहकाराचे जाळे महाराष्ट्रात पसरले आहे. १९८५ नंतरच्या सहकाराचे नेतृत्व करणाऱ्यांनी सहकाराची प्रगती करण्यापेक्षा स्वतःची प्रगती केल्याने या क्षेत्राचा ऱ्हास झाला. सहकार चळवळीचा सूडबुद्धीने वापर केला. आपण आधी मजूर होतो, पण मजूर प्रगती करत नाही का, मला सांगितलेले की मजूर संस्थेचा राजीनामा द्या, मी तसा राजीनामाही दिला, पण विरोधी पक्ष नेत्याला चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गिरीश महाजन यांच्याप्रमाणे मला अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही दरेकर म्हणाले.

सहकार चळवळीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

राज्यात मजूर संस्थांमध्ये लाखो मजूर काम करत आहेत. या सर्व संस्थांसाठी शासन काय करणार आहे? १० टक्के सहकार चळवळीत चुका असतील म्हणून सगळा सहकार चुकीचा ठरत नाही. उद्या मला अटक केली तरी मी घाबरत नाही, पण शेवटी या मजूर संस्थांचे काय करणार? हा प्रश्न आहे. मुंबै बँक १२०० कोटीवरून बँक २० वर्षांत १० हजार कोटीवर आणली, हा माझा गुन्हा झाला. राज्यातील ३-४ बँका सोडल्या तर सगळ्या सहकार संस्था पुढाऱ्यांनी खाऊन टाकल्या. माझी चौकशी करण्याआधी गुन्हा दाखल केला. तसा गुन्हा मेहबूब शेख, रघुनाथ कुचिक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे, तोही वाचून दाखवा. त्यांचे निवेदन सभागृहात वाचून दाखवा. माझ्यावर गुन्हा दाखल करता, तुमचेही घर काचेचे आहे. जर तुम्ही या सहकार चळवळीची चौकशी केली नाही, तर आपण स्वतः अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे, असेही दरेकर म्हणाले.

माझ्यावर द्वेष भावनेतून गुन्हा 

माझ्यावर द्वेष भावनेतून गुन्हा दाखल झाला, माझ्यावर कारवाई करा, पण आपण ज्या संस्था रद्द करणार आहेत, त्यांचे भवितव्य काय असणार आहे? असे विचारत राज्यातील मजूर संस्थांच्या फेडरेशन अध्यक्ष हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत असे सांगत दरेकर यांनी ही यादीच जाहीर केली. याशिवाय १०३ आजी माजी आमदार जे मंत्री होते यांची यादी आहे. या सगळ्यांची चौकशी करावी. माझ्यावरील कारवाईचा प्रश्न नाही. २५ वर्षे मी सहकार चळवळीत काम करत आहे. या मजूर संस्थांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. चळवळीवर दरोडे यांनी टाकायचे आणि कारवाई आमच्यावर करायची, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

 कोण आहेत कोणत्या मजूर संस्थेचे अध्यक्ष? 

  • सय्यद अकबर –  जालना, काँग्रेस
  • ए वारे – परभणी राष्ट्रवादी
  • वामनराव देशमुख – वाशीम, काँग्रेस
  • नंदकुमार पाटील – बुलढाणा, राष्ट्रवादी
  • दिनकर उबाळे – नाशिक, काँग्रेस
  • अंकुश पाटील –  यवतमाळ, राष्ट्रवादी
  • कैलास नगीने भंडारा, राष्ट्रवादी
  • घोसाळकर – पुणे, राष्ट्रवादी
  • भोयर –  गडचिरोली, काँग्रेस
  • साठे – सांगली, राष्ट्रवादी
  • प्रमोद झाम्ब्रे – सातारा, राष्ट्रवादी
  • नारायण ननावरे – उस्मानाबाद, काँग्रेस
  • मोरेश्वर मंथारे – वर्धा, काँग्रेस
  • दिलीप पाटील – नागपूर, राष्ट्रवादी
  • बन्सी शिरसाट – बीड, राष्ट्रवादी
  • स्वप्नील निखारे – नागपूर, काँग्रेस
  • लीलाधर तायडे – जळगाव, राष्ट्रवादी
  • ज्ञानेश्वर दादा – हिंगोली, राष्ट्रवादी

(हेही वाचा आमदारांना ‘या’ गुन्ह्याची वाटतेय भीती! सरकारवर आणला दबाव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.