मुंबईतील मराठी मने(मते) जिंकण्यासाठी भाजपाचा ‘मराठी कट्टा’

मुंबईतील मराठी मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपा आता ‘मराठी कट्टा’ ही नवीन संकल्पना अंमलात आणणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच पक्ष झाडून तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सत्तेत भागीदार असलेल्या तीन पक्षांनी मात्र मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसी असून, मतदारांना आकर्षित करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या निवडणुकीत काही मतांच्या फरकाने मुंबई महापालिकेची सत्ता गमावणा-या भाजपने यंदा कमळ खुलवण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे मुंबईतील मराठी मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपा आता ‘मराठी कट्टा’ ही नवीन संकल्पना अंमलात आणणार आहे.

(हेही वाचाः शिवसेना आमदाराची भाजपा नगरसेविकेच्या वॉर्डात ढवळाढवळ)

नितेश राणेंवर जबाबदारी

1 ऑक्टोबरपासून भाजपच्या या मराठी कट्टा या संकल्पनेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे वारंवार टीका करणा-या आमदार नितेश राणेंवर या ‘मराठी कट्टा’च्या आयोजनाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सुनील राणे यांच्यावर देखील ही धुरा सोपवण्यात आली आहे.

यावर होणार चर्चा

चेंबूर घाटला व्हिलेज इथून भाजपाच्या मराठी कट्टा संकल्पनेचा प्रारंभ होणार आहे. मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसेच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेला अन्याय यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न मुंबई भाजपा या संकल्पनेतून करणार आहे.

(हेही वाचाः शिवसेनेने बेस्ट समितीत इतिहास रचला)

मराठी मने जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई भाजपाने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मतांचा कायमंच भाजपाकडे कल राहिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड करणा-या मराठी माणसांची मन जिंकत त्यांची जास्तीत-जास्त मते आपल्याकडे वळवण्याचा भाजपाचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here