मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी 3 दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हुजरेगीरी करूनही हाती कोरडे चिपाडच लागले. तीन दिवस बैठका, भेटी घेऊनही रिकामे हात हलवत परत यावे लागले आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. उबाठाच्या दिल्ली वारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडाच पण उबाठाच्या हातीही धुपाटणेच आले अशीही कोपरखळी उपाध्ये यांनी मारली.
(हेही वाचा –Shirdi International Airport: शिर्डी विमानतळ जप्त होणार? काय आहे प्रकरण?)
उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहेत, ना चव…ना रस …ना गोडवा आहे. मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेपायी उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले. पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होणार असून, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे सांगून ठाकरे यांची निराशा केली. जागावाटपातही काँग्रेस मोठा भाऊ असणार असा स्पष्ट संदेश दिल्लीवारीतून उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने दिल्याने उबाठा सेनेने स्वाभिमान गमावला. विधानसभेसाठी जास्ती जागा लढविता याव्यात यासाठी उबाठांनी दिल्लीवारी केली मात्र त्याही बाबतीत निराशाच पदरी पडणार आहे. (Keshav Upadhye)
ज्या अमित शाहांची तुलना ठाकरे यांनी अब्दालीशी केली, तेच अमित शाह भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले होते. 2019 मध्ये भाजपाने तुमचा सन्मान राखत तुम्हाला 125 जागा दिल्या होत्या आता तुम्हाला 100 जागा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली तख्तापुढे झुकावे लागते आहे. जागावाटपात 100 जागाही तुम्हाला मिळणार नाहीत मग तुमच्या दिल्ली दौऱ्यातून नेमके पदरी तरी काय पडले असा खोचक सवाल उपाध्ये यांनी केला. (Keshav Upadhye)
(हेही वाचा –Delhi Police : पुणे ISIS मॉड्यूल संबंधित वाँटेड दहशतवादी रिझवान अटकेत)
महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पाया पुढे न ठेवण्याच्या बाता मारणारे ठाकरे हे सोनिया गांधींना भेटले असे सांगत असले तरी त्यांची भेट खरंच घडली का याबाबत मनात शंकाच आहे. कारण या भेटीचे फोटो कुठे दिसले नाहीत, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला. (Keshav Upadhye)
महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मविआ च्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका घेतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती ती देखील धुळीस मिळाली. ठाकरे हे केवळ स्वत:च्या राजकीय हव्यासापोटी दिल्लीला गेले होते त्यांना महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही, अशी टीका उपाध्ये यांनी केली. (Keshav Upadhye)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community