आघाडी सरकारच्या मदतीनं परमबीर सिंह गायब, शेलारांचा आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भाजपाने पळवून लावल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या वारंवार होणाऱ्या आरोपांना आता भाजपाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. परमबीर सिंह यांना गायब करणे हा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे, असा आरोप भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

‘महाराष्ट्र सरकार जबाबदार’

तसेच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गायब असतील, पळुन गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. परमबीर सिंह राज्यातून पळून गेला कसा? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असे आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिले आहे. परमबीर सिंह पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंह पळून गेले मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत आहे, असेही ते म्हणाले.

‘तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल’

ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करत आहे. परमबीर सिंह यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करत असून हा एक डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला आहे.

(हेही वाचा-“आम्ही नको ती अंडी उबवली”, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला)

मिळालेल्या माहितीनुसार, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार या महिन्यापासून रोखण्यात आला आहे. याशिवाय परमबीर सिंह यांना निलंबित करण्याची तयारी सुरु आहे. ठाणे, मुंबई गुन्हे शाखेकडे त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याविरोधात अदखलपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता परमबीर सिंह यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here