मुंबई भाजपातर्फे ३७० ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून मेगा दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर १ हजार मंडळांच्या ५० हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. याखेरीज मुंबईतील भाजप नेत्यानी वैयक्तिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ‘भाजप’चं ढाक्कुमाक्कुम… ढाक्कुमाकुम..!)
मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी तब्बल १२० हून अधिक गोविंदा पथक शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. यंदाची दहीहंडी महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची असणार आहे, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.
कोविडनंतर प्रथमच निर्बंध मुक्त गोपाळकाला साजरा होत आहे. त्यातच भाजपचे मुंबई नेतृत्व पुन्हा आमदार आशिष शेलार यांच्या हाती आल्याने त्यांनी मुंबईत सर्व प्रभागांमध्ये दहीहंडी बांधून आधीच पक्ष फुटीमुळे बेहाल झालेल्या शिवसेनेपुढे आणखी एक आव्हान निर्माण केले आहे.
(हेही वाचा – ढाक्कुमाकुम..! ‘मनसे’कडून ‘त्या’ गोविंदा पथकांना मिळणार ‘स्पेन’ वारी)
वरळीत रंगणार भव्य दहीहंडी उत्सव
दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात शिवसेना नेते आणि आमदार सचिन आहिर हे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असतात. पण यंदा पहिल्यांदाच भाजपने सर्वात आधी जांबोरी मैदान पटकावून आहिर यांच्यावर मात केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव आयोजनासाठी जांबोरी मैदान परिसरात नव्या जागेचा शोध सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. वरळीतील जांबोरी मैदानात शुक्रवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन होणार असून या उत्सवाला कसा प्रतिसाद मिळणार? याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.
Join Our WhatsApp Community