BJP : मुंबई भाजपचीच हिट विकेट पडणार नाही ना?

181
भाजप
  • सचिन धानजी

देशात आणि राज्यात सरकार स्थापन करणाऱ्या भाजपचे मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचे मोठे स्वप्न आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ‘मिशन १५०चे’ उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. भाजपला आता एवढा आत्मविश्वास आहे की, महापालिका निवडणुकीत आम्हीच जिंकू आणि आमचीच सत्ता महापालिकेवर येईल. मुंबई ही शिवसेनेची…, मुंबई ठाकरेंची होती…, असे जे काही आपल्या मनावर बिंबवले जात होते, त्यामुळे परंपरागत मतदार हा शिवसेनेच्या बाजुने मतदान करत आला. अर्थात मागील पाच वर्षांचा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकांमध्ये मतदार हे शिवसेना भाजप म्हणून युतीच्या बाजुने मतदान करत होते. परंतु या दोन्ही पक्षांचे फिस्कटल्यानंतर भाजपने महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याचा पक्का निर्धार केला आहे. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेना भाजपसोबत सरकारमध्ये आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुका युतीत लढल्या जाणार. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस हा तिसरा भिडू असल्याने भाजपच्या बाहुत आणखी बळ वाढले आहे.

मागील सरकार हे युतीचे असतानाही दोघांमध्ये फिस्कटलं आणि महापालिका निवडणुकीत एकला चलो रेचा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवली गेली. याचा फायदा भाजपला झाला आणि ३४ नगरसेवकांवरून भाजपने ८२ नगरसेवकांपर्यंत मजल मारली. तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले. भाजपचा नक्कीच फायदा झाला पण शिवसेनेचाही कुठेही तोटा झाला नाही. मात्र आता जेव्हा शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्यासोबत युतीत ही निवडणूक लढवल्यास आपल्याला अधिक फायदा होईल असा जर व्होरा भाजप काढून स्वस्थ बसणार असेल तर ती आत्महत्या ठरेल, असेच म्हणावे लागेल. आजही मुंबईत शिवसेनेपेक्षा उबाठा गटाचे वर्चस्व आहे आणि त्याचा प्रभाव विधानसभा व लोकसभेत जरी दिसला नाही तर महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच दिसेल.

भाजपचे मुंबईत ८२ नगरसेवक निवडून आले होते, पण हे कामांच्या आधारे निवडून आले होते का? तर नाही. ते सर्व नगरसेवक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर निवडून आले होते. पण या ८२ नगरसेवकांनी पुढे असे कोणते काम केले जे पुन्हा त्याच कामांवर निवडून येतील? मुळात जिथे ७ मार्च २०२२ रोजी महापालिका संपुष्टात येवून प्रशासक बसले, तिथून दीड वर्षाचा कालावधी लोटत आला. तेव्हापासून नगरसेवकांचे अधिकारच संपुष्टात आले आणि महापालिकेत या नगरसेवकांना कुणी विचारत नाही. त्यामुळे ज्या नगरसेवकांनी आपल्या विभागात विकासकामे केली आहेत ती आता लोकांच्या विस्मरणात गेली आहेत. ज्या विकासकामांच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या जोरावर नगरसेवक मतदानाची पोतडी भरत होते, ते या प्रशासक राजवटीत शुन्य बनले आहेत. हे केवळ भाजपचेच नव्हे तर सर्वच पक्ष शुन्य बनले असून त्या सर्वांना नवख्या नगरसेवकाप्रमाणे निवडणुकीला उभे राहावे लागणार आहे. आज जनसंपर्क असणारे नगरसेवक भाजपात तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहेत. त्या तुलनेत उबाठा शिवसेनेकडे असे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आहेत. मुळात मागील निवडणुकीत ज्यावेळी ८२ नगरसेवक निवडून आले त्या-त्या प्रभागांमध्ये मुंबई भाजपने पुढाकार घेऊन वॉर्ड अध्यक्षांकरता पक्ष कार्यालय तथा सेवालय उभी केली असती तर पक्षाची पाळेमुळे शिवसेनेप्रमाणे मजबूत व्हायला मदत झाली असती. परंतु निवडून आलेल्या नगरसेवकांनी उघडलेल्या कार्यालयांवर पक्ष खुश झाला, पण नगरसेवकपद संपुष्टात आल्यानंतर या भाड्यावर घेतलेल्या कार्यालयांच्या खर्चाचा भार सोसणे कठीण झाल्याने त्यांनी आपली कार्यालये बंद केली. अशावेळी जनतेने आपल्या समस्या घेऊन कुणाला आणि कुठे भेटावे. त्या तुलनेत संपूर्ण मुंबईत शिवसेनेच्या शाखा आहेत, त्या शाखांमध्ये नगरसेवक नसेल तर शाखाप्रमुख भेटतो, काम होते म्हणून लोक तिथे जावू लागली. पण मुंबई भाजपला यासाठी काही करावे असे वाटले नाही. ते आजही मोदी, शाह आणि फडणवीस यांच्या करिष्म्यावर निवडून येण्याची स्वप्ने पाहत आहेत.

(हेही वाचा Maharashtra Politics : विरोधी पक्षनेता कोण होणार? काय म्हणाले जयंत पाटील?)

मुंबईचे अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांची निवड झाल्यानंतर पक्षातील अनेकांचा जोश वाढला होता, पण शेलारांनाही आता पक्ष वाढवण्यात काही स्वारस्य राहिलेले नाही. त्यांना आता गृहनिर्माण मंत्री बनण्याची स्वप्ने पडू लागली असून ते स्वप्न साकार करण्यासाठी ते अधिक प्रयत्नशील आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे कोषाध्यक्ष बनल्यानंतर शेलारांनी मुंबईत लक्ष घालण्याचे प्रमाण कमी केले.

महापालिकेत माजी नगरसेवकांसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही तो नंतर आयुक्तांनी रद्द करून प्रशासकीय कार्यालयनिहाय निधीची तरतूद केली. त्यातून शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील माजी नगरसेवकांच्या प्रभागात विकास निधी दिला जात असताना भाजपच्या माजी नगरसेवकांना डावलले गेले. पण मुंबई अध्यक्ष म्हणून शेलारांना ही बाजू मांडता आली नाही. नालेसफाईच्या पाहणीचे दोन चार दौरे करत शेलारांनी महापालिकेवर टीका केली. मुळात सरकारमध्ये राहून तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता. नालेसफाईच्या कामांमध्ये मापात पाप, रतन खत्रीचे आकडे, असे जेव्हा तुम्ही आरोप करता, तेव्हा नाल्यात कचरा टाकणाऱ्या रहिवाशांचे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनप्रबोधन करून त्यांना नाले हे कचरा टाकण्यासाठी नव्हे तर त्यासाठी कचरा पे मुंबई भाजपची हिट विकेट तर पडणार नाही ना? याची आठवण करून द्यायला हवी. आज मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे आहेत, मग भाजपने यासाठी पुढाकार घेऊन दिसला खड्डा घ्या महापालिकेकडून बुजवून, असा प्रयत्न का केला नाही? तुम्ही किती विकासकामे केली यापेक्षा जनतेला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा किती प्रयत्न करता हे महत्वाचे असते.

जो जनसंपर्क वाढवेल तो भविष्यात निवडणुकीत मतदानाच्या रुपात आपल्या पारड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आंदोलन करून, वारंवार बैठका घेऊन पक्ष वाढत नसतो तर जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होईल असे काम केल्याने नेता आणि पर्यायाने पक्ष मोठा होत असतो. त्यामुळे आधीच जनसंपर्क कमी, लोकांच्या समस्यांकरता धावून न जाणे आणि त्यातच फोडाफोडीचे राजकारण, यामुळे येणारी महापालिका निवडणूक भाजपसाठी म्हणावी तेवढी सोपी नाही. आज भाजपचे नेते आणि पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांत केलेल्या ९ प्रमुख कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. याचा फायदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल. पण महापालिका निवडणुकीचे काय? या कामांच्या आधारे तर मत मागता येणार नाही? त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात आशिष शेलार यांची तंत्रशुद्ध फलंदाजी सुरू असली, बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांच्यासोबत चांगले ट्युनिंग जमवून घेत भारतीय क्रिकेटला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांच्या क्रिकेटमधील व्यस्त शेड्युल्डमुळे त्यांचे मुंबईकडे दुर्लक्ष होतेय का, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे क्रिकेटकडे अधिक वेळ देता देता मुंबई पालिका निवडणुकीत त्यांची हिट विकेट तर पडणार नाही ना, अशी चर्चा होत आहे. येणाऱ्या निवडणुकीत गृहमंत्री अमित शाह यांच्या टार्गेटनुसार १५०चे मिशन पूर्ण करणे हे भाजपच्या आजच्या कार्यपद्धतीवरून स्पष्ट होत नसून मुंबईतील पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षांना सक्षम करत त्यांनी जनसंपर्क अभावी भाजपची मुंबईत विकेट गेली तर याच प्रकारच्या हिट विकेटमुळे असेल, असं तरी आज दिसून येतंय.

(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची घेतली भेट; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.