आशिष शेलारांनी फडणवीस यांना केले मुंबईतून बाजूला?

102
भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून मंगल प्रभात लोढा हे सक्रिय असताना मुंबईवर विशेष लक्ष देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मागील काही आठवड्यांपासून मुंबईतून काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. मंगल प्रभात लोढा हे राज्याचे मंत्री बनल्यानंतर त्या रिक्त जागी मुंबई अध्यक्ष म्हणून आमदार ऍड. आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. पण शेलार यांच्या नियुक्तीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकडे लक्ष देणे सोडले असल्याचे दिसून येत आहे. शेलार अध्यक्ष बनल्यापासून फडणवीस आणि त्यांचे विश्वासू सहकारी आमदार हेही काही प्रमाणात शांत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेलार यांना मुंबईचा गड फडणवीस यांनी आगामी  महापालिका निवडणुकीत जिंकण्यासाठी मोकळे रान करून दिले की शेलार यांनी फडणवीस यांना मुंबईत त्यांची लुडबुड सहन करणार नाही, असा इशारा देत मुंबईपासून दूर ठेवले, असा प्रश्न निर्माण होत आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम हाती घेतली होती

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांची वर्णी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी लागल्यानंतर १२ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार ऍड. आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र यापूर्वी एवढा मुंबईचे अध्यक्ष असताना मुंबईवर महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी विद्यमान भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक प्रकारे आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमित साटम, आमदार योगेश सागर, आमदार मिहीर कोटेचा, भाजपचे माजी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, माजी महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा आदींची टीम कामाला लावत जोरदार भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. फडणवीस आणि त्यांची सहकाऱ्यांनी राज्यातील ठाकरे सरकार आणि त्यांचा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्ष यांना अडचणीत आणण्याचा वारंवार प्रयत्न केला होता.

शेलार यांना कोणतीही संधी दिली जात नव्हती

मात्र, मागील काही आठवड्यापासून आशिष शेलार यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी पक्षाने सोपवल्यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या त्या दिवसापासून फडणवीस आणि त्यांचे इतर सहकारी मुंबईतील भ्रष्टाचार विरोधात जास्त आवाज करताना दिसत नाही. शेलार हे यापूर्वी अधिक सक्रिय नव्हते. त्यामुळे फडणवीस हे लोढा अध्यक्ष असताना पूर्णपणे मुंबईवर पकड ठेवून होते. त्यावेळी शेलार यांना कोणतीही संधी दिली जात नव्हती, तरीही शेलार हे अधूनमधून शिवसेनेवर हल्ला चढवून आपले अस्तित्व टिकवून होते. परंतु मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून फडणवीस आणि त्यांची टीम सक्रिय झालेली दिसत नाही. त्यामुळे फडणवीस यांनी मुंबईत लक्ष घालू नये या अटीवरच शेलार यांनी अध्यक्षपद स्वीकारले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच फडणवीस यांची टीम गप्प बसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. एका बाजूला ही टीम गप्प असताना, खासदार मनोज कोटक यांना सक्रिय करून घेत शेलार यांनी त्यांना आपल्या जवळ घेतले आहे.

फडणवीसांना बाजुला करण्यामागे कारण काय?

सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत आशिष शेलार हे मुंबईच्या अध्यक्षपदी होते आणि त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले होते. त्यामुळे त्या निवडणुकीत आजवर २९ ते ३४ नगरसेवकांपर्यंत मजल मारणाऱ्या भाजपाला ८२ पर्यंतचा आकडा गाठता आला होता. त्यामुळे एक प्रकारे महापालिकेवर भाजपच्या भगवा फडकवणं शक्य होते. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी अनुकूल वातावरण असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबतची मैत्री जपण्यासाठी भाजपचे नगरसेवक हे पहारेकरी म्हणून  भूमिका बजावतील असे  जाहीर केले. त्यामुळे फडणवीस यांनी स्वतःचे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी अवघ्या पक्षाला दावणीला बांधत निवडून आलेल्या ८२ नगरसेवकांचा स्वप्न भंग करत त्या नगरसेवकांचे फार मोठ नुकसान केले. या पाच वर्षांमध्ये या ८४ निवडून आलेल्या नगरसेवकांचे जे नुकसान झाले ते यापूर्वी  महापालिकेत २९ ते ३४ नगरसेवक आलेल्या नगरसेवकांचेही झाले नव्हते. भाजपचे ८४  नगरसेवक निवडून आल्यानंतर पहारेकरी म्हणून न राहता जर शिवसेनेसोबत युती केली असती, तर भाजपला काही महत्वाची पद आणि विकासनिधी हे सुद्धा उपलब्ध होऊ शकला असता आणि यातून पक्षाला आणि पर्यायाने निवडून आलेल्या नगरसेवकांना विकासकामे करता आली. फडणवीस यांच्या चुकीच्या निर्णयामुळे निवडून आलेल्या ८२ नगरसेवकांचे मोठे नुकसान होण्यात फडणवीस यांच्या चुकीचा निर्णय कारणीभूत असल्याने मोठा नुकसान झाले होते. त्यामुळे शेलार हे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी फडणवीस यांना आधी बाजूला केल्याचे बोलले जात आहेत. फडणवीस यांनी मुंबईत कोणत्याही प्रकारचे लक्ष घालू नये, जे काम केलं जाईल ते मी स्वतः करीन आणि महापालिकेवर भाजपच्या भगवा फडकवून दाखवेन असा निर्धार आणि शब्दच शेलार यांनी दिल्यामुळे काही प्रमाणात फडणवीस यांना बाजूला व्हावे लागले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेलार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर फडणवीस यांना कात्रजचा घाट दाखवले असल्याचेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.