मुंबई काँग्रेस… मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष कुणी ही होवो, पण मुंबई काँग्रेसमधील वाद काही मिटता मिटत नाहीत. आधी संजय निरुपम-गुरुदास कामत यांच्यातील वाद आपण सगळ्यांनी ऐकले असतील. पण आता नव्याने मुंबई अध्यक्ष झालेल्या भाई जगताप यांच्या विरोधात देखील नाराजी उघड होऊ लागली आहे. एकीकडे भाई जगताप मुंबई महापालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा करत असताना, आता त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने त्यांची तक्रार थेट हाय कमांडकडे केली आहे.
झिशान सिद्दीकी भाईंवर नाराज
काँग्रेसचे वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून, भाई जगतापांविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बीकेसी पोलिस स्टेशन येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक सामग्रीचे वाटप काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांना बोलावण्यात आले नव्हते. त्यावर झिशान यांनी आक्षेप घेतला आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांवर भरवसा नाय का?)
म्हणून झिशान यांची तक्रार
मुंबई युवक काँग्रेसच्या निवडणुकीत झिशान यांच्या उमेदवाराला मदत केल्यास पक्षात तुम्हाला कोणतेही पद दिले जाणार नाही, असे काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. पक्षात माझ्याविरुद्ध काम करणाऱ्यांना बळ देण्याचे कामही नेतृत्वाकडून केले जात आहे, अशा अनेक बाबी नमूद करत झिशान यांनी भाई जगताप यांची तक्रार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
काय म्हणाले भाई?
काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आमदार सिद्दीकींनी तक्रार करण्यामागे नेमके प्रकरण काय, हे त्यालाच विचारा. प्रत्येकाला काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचा अधिकार आहे, आमच्या पक्षात लोकशाही आहे. सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो, त्यांच्याकडे विचार मांडण्याचा अधिकार आहे. मुंबईत आमचे चार आमदार आहेत, त्यापैकी तो सर्वात तरुण आमदार आहे. त्याचा उत्साह मी समजू शकतो. त्याचे जितके वय आहे, त्यापेक्षा जास्त काळ मी राजकारणात आहे आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये. त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक मी अध्यक्ष म्हणून वेगळी वागणूक कोणाला देत नाही. ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात. प्रोटोकॉल असेल, तर तो झिशान सिद्दीकीलाही लागतो आणि भाई जगतापलाही लागतो. मी झिशान सिद्दीकीशी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईकडे बघायला ‘वेळ’ नाही! मग कोण करणार नेतृत्त्व?)
Join Our WhatsApp Community