राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असले, तरी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी काही महिन्यांपूर्वीच केली होती. भाईंच्या या घोषणेनंतर काही मत-मतांतरे देखील समोर आली होती. मात्र भाई जगताप यांनी केलेली ती फक्त घोषणा नसून, काँग्रेसने तशा हालचाली देखील मुंबईत सुरू केल्या आहेत. काँग्रेसच्या मुंबईतील हालचाली बघता, जरी काँग्रेस राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनसोबत असली, तरी मात्र मुंबई महापालिका निवडणूक मात्र काँग्रेस स्वबळावर लढणार हे निश्चित आहे.
(हेही वाचाः सत्तेत असूनही काँग्रेस अनेकदा नाराज… कशी दूर होणार नाराजी?)
निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी
काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी केली असून, काँग्रेसने काही निरीक्षक देखील तालुका स्तरावर नेमले आहेत. एका तालुक्यात पाच निरीक्षक नेमले असून, हे निरीक्षक प्रत्येक वॉर्डची माहिती घेत असून, काँग्रेसची काय अवस्था आहे याचा देखील मागोवा घेत आहेत. तसेच काँग्रेसला आणखी जोर लावल्यास कुठे, कसा आणि किती फायदा होईल, याचे देखील निरीक्षण करत आहे. हे निरीक्षक इच्छुक उमेदवारांकडून तसेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांकडून देखील माहिती जमा करण्याचे काम करत आहेत.
(हेही वाचाः महाविकास आघाडीत काँग्रेसचे मंत्री खूश, कार्यकर्ते मात्र नाखूष)
अंतर्गत गटबाजी संपवण्याकडे भाईंचा कल
मुंबईत जर विचार केला तर काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. त्यामध्ये संजय निरुपम यांना मानणारा एक गट, काँग्रेसचे दिवगंत नेते गुरुदास कामत यांना मानणारा एक गट, तर कृपाशंकर सिंह यांना मानणारा वेगळा गट असे काँग्रेसच्या नेत्यांचे बरेच गट आहेत. मात्र मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर खुद्द भाई जगताप आता स्वत: हे गटातटाचे राजकारण सोडवण्यासाठी पुढाकार घेत असून, त्यांनी अशा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत. एवढेच नाही तर भाई जगताप हे सध्या स्वत: मुंबईच्या काही भागात फिरत असल्याचे दिसत आहे.
येत्या काळात काँग्रेस मुंबईत कार्यक्रम राबवणार
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रसने 100 दिवसांचा कार्यक्रम तयार केल्याचे भाई जगताप यांनी मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर सांगितले होते. त्या दिशेने आता काँग्रेसने सुरुवात केली असून, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर काँग्रेसच्या या कार्यक्रमांना अधिक जोर येणार आहे. तसे आदेशच कार्यकर्त्यांना देण्यात आले असून, काँग्रेसचे कार्यकर्ते देखील तसे कामाला लागले आहेत.
Join Our WhatsApp Community