देशातील विविध राज्यांच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये युवा डॉक्टर्सना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जाऊन तेथील लोकांना एक आठवडा निःशुल्क आरोग्य व वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘सेवांकुर भारत’ प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद आहे. या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन प्रत्येक नागरिकाने एक आठवडा देशकार्यासाठी दिला तर भारताला गतवैभव प्राप्त करता येईल असे प्रतिपादन राज्यपाल C. P. Radhakrishnan यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या ‘सेवांकुर भारत : वन वीक फॉर द नेशन’ या विविध राज्यांमधील वैद्यकीय सेवा कार्यावर आधारित लघुपटाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचा – Plane Accident : अमेरिकेत दोन विमानाची हवेत धडक, दोघांचा मृत्यू)
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विविध वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण व आदिवासी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्यास त्यांचे अनुभवविश्व व्यापक होईल असे नमूद करून या संदर्भात आपण राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाला या प्रकल्पाला सहकार्य करण्याबाबत सूचना करू असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाशी अनेक वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी जोडले जातील व ग्रामीण भागात सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध होतील असे राज्यपालांनी सांगितले. या प्रकल्पात सहभागी सर्व डॉक्टर्स तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले.
‘त्वदियाय कार्याय बद्धा कटीयम’ हे वाक्य मातृभूमीसाठी सेवा करण्याची प्रेरणा देणारे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना संघविचारातून प्रेरणा मिळत आली आहे असे राज्यपालांनी सांगितले.
(हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर ? फोटो व्हायरल)
यावेळी ‘स्वयम टॉक्स’ या लघुपट निर्माण करणाऱ्या संस्थेचे संस्थापक नवीन काळे, सहसंस्थापक आशय महाजन व लेखक दिग्दर्शक ओंकार ढोरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वयमचे जॅकी पटेल यांनी सेवांकुर भारत लघुपट निर्मितीला अर्थसहाय्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. उद्योजक गोविंद गोयल यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, डीन डॅा स्वाती शिरडकर, सचिव डॉ. अश्विनीकुमार तुपकरी तसेच प्रतिष्ठानचे सदस्य व युवा डॉक्टर्स उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community