सेनेच्या २५ वर्षांची कारकीर्द सांगताना काय म्हणाल्या माजी महापौर? वाचा… 

२५ वर्षांत करुन तर दाखवलेच आहे आणि सन २०३० पर्यंतच्या मुंबई शहर आनंदी व विकसित शहर करण्याच्या दृष्टीकोनातून नागरी सुविधा जागतिक दर्जाच्या सुधारुनही दाखवू, असाही विश्वास व्यक्त केला.

133

शिवसेनेने २५ वर्षांत काय केले असा सवाल विचारणाऱ्या भाजप नगरसेवकांचा माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी समाचार घेतला. आम्हाला २५ वर्षांत काय केले यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नसून, याचे प्रमाणपत्र जनतेने आम्हाला दिले म्हणून आम्ही महापालिकेत सत्तेवर बसलो असल्याचे सांगितले. आम्ही २५ वर्षांत काय केले हे भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या महापालिका गटनेत्यांना विचारावे, असे सांगत त्यांनी २५ वर्षांत करुन तर दाखवलेच आहे आणि सन २०३० पर्यंतच्या मुंबई शहर आनंदी व विकसित शहर करण्याच्या दृष्टीकोनातून नागरी सुविधा जागतिक दर्जाच्या सुधारुनही दाखवू, असाही विश्वास व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन

मुंबई महापालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेताना माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे यांचे खास अभिनंदन केले. कारण आजवर आम्ही सखल भागात पाणी तुंबते हेच ऐकत होतो. पण या सखल भागात तुंबणाऱ्या पाणी समस्या कायमची सोडवण्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केला. त्यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील अशाप्रकारच्या सर्वच सखल भागांमध्ये तुंबणाऱ्या पाणी समस्येचे निवारण करण्यासाठीचा अभ्यास करुन त्या दृष्टीकोनातून कामे हाती घेण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्य जलवाहिनी विभागाची कामे आपण प्रथमच हाती घेतली आहेत. नेमकी कुठली कामे हाती घ्यावीत याचे मार्गदर्शन आणि पाठपुरावा आदित्यजींनी घेऊन प्रशासनाला ही कामे हाती घेण्यास भाग पाडले. या सर्व कामांचा पुढे पाठपुरावा करुन स्थायी समितीच्या मान्यतेने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही जे काही प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.

(हेही वाचाः छत्रपती शिवाजी महाराज पार्क आता अधिक तेजोमय! पण…)

शिवसैनिकांच्या अंगात समाजकारणाचे रक्त

राजकारण करायचे झाले तर खूप करता येईल असे सांगत जाधव यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाचे रक्त शिवसैनिकांच्या अंगात भिनलेले आहे. त्यामुळे तुम्हाला कायम राजकारण दिसते. पण आमच्या पक्षाचे युवा नेते व पर्यावरणमंत्री ध्येय्याने मुंबईच्या विकासाचे काम करत आहेत. ते या अर्थसंकल्पावर नजर मारल्यास लक्षात येईल,असे म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाती घेतला तरी मुंबई महापालिकेच्या विकासकामांकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. मुंबईच्या विकासाचे स्वप्न् उध्दव साहेबांनी पाहिलेले असून, ते साकारण्याचा पूर्णपणे प्रयत्न ते करत आहेत. आज राज्यात सत्ता असल्याने यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांकडून जेवढे सहकार्य आणि मदत महापालिकेला मिळत नव्हती, तेवढी मदत आता महापालिकेला मिळत असल्याचे सांगितले.

कोस्टल रोडचे काम जलद

आज मुंबईत जो कोस्टल रोड प्रकल्प सुरु आहे, तो प्रकल्प जलदगतीने होण्यासाठी आणि मुंबईकरांना लवकरात लवकर खुला करुन देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आग्रही आहेत. आम्ही आमचे भाग्य समजतो की हा प्रकल्प अशा डॅशिंग महिला अधिकाऱ्याच्या हाती आहे, ज्यांनी मेट्रोच्या कामाला गती दिली होती. त्यामुळे भिडे मॅडम हा प्रकल्प लवकरच साकारण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्या आपल्या प्रयत्नात कुठेही कमी पडणार नाहीत, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचाः महापालिकेच्या शिक्षण विभागाची खादी गणवेशावर ‘फुल्ली’!)

जलबोगद्याने पाण्याचा प्रश्न सुटणार

घाटकोपर पूर्व येथील हेगडेवार मैदान ते प्रतीक्षा नगर, वडाळा आणि प्रतीक्षा नगर ते परळ सदाकांत ढवण मैदानपर्यंतच्या ९.६ कि.मी. जलबोगद्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. कोविड काळातही हे काम सुरू होते. हेगडेवार मैदान ते आरसीएफ आणि आरसीएफ ते बीआरसी दरम्यान साडेपाच किलोमीटरचा जलबोगदा प्रकल्प बांधण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी माननीय पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते या जलबोगदा खोदण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे या जलबोगद्यामुळे पूर्व व शहर भागातील पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे. मुंबईत आरक्षण समायोजनेअंतर्गत ब-याच इमारती बांधून महापालिकेला हस्तांतरित केल्या जात आहेत. पण त्या वास्तूंचा योग्यप्रकारे उपयोग होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अँटॉप हिल येथील दोस्ती एकर जवळील बेस्ट स्थानकाच्या जागेचा विकास करुन तिथे बस उभ्या राहण्याची व्यवस्था करावी व पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर भाजी व अन्य विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशीही सूचना त्यांनी केली.

सल्लागार कक्ष निर्माण करा

मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागातील हुशार अधिकाऱ्यांचा एक गट तयार करुन, सल्लागार कक्ष तयार करण्यात यावा. कारण आज काही झाले तरी सल्लागार नेमला जातो. त्या सल्लागारावर आणखी एक सल्लागार. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, तांत्रिक बाबी तपासण्यासाठी सल्लागार आणि त्यांच्यावरही लक्ष ठेवण्याठी तिसरा सल्लागार अशाप्रकारे प्रत्येक विकासकामांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये सल्लागारांची एक साखळी तयार केली जाते. या सल्लागारांमध्ये नाही म्हटल्यास आतापर्यंत ३०० ते ४०० कोटी रुपयांची खैरात करण्यात आली आहे. त्यामुळे सल्लागारांची ही बांडगुळे उखडून फेकून देऊन आपल्याच अधिकाऱ्यांवर विश्वास टाकायला हवा. शेवटी आपल्याच अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सल्लागार अहवाल बनवत असतात. त्यापेक्षा सल्लागार कक्षच स्थापन केल्यास अधिकाऱ्यांवरच याची जबाबदारी निश्चित करता येऊ शकते, असेही आपल्या भाषणात श्रद्धा जाधव यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः मुख्यालय इमारतीच्या नूतनीकरणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अडथळा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.