सध्या मुंबईसह संपूर्ण देशात चर्चा आहे ती अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेने केलेल्या कारवाईची. कंगनाच्या कार्यालयावर पालिकेने कारवाई केल्यानंतर शिवसेनेवर टिका होत आहे. तसेच कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या शिवसेनेला मुंबईतील इतर अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे. त्यातच आता मार्च २०१६ ते जुलै २०१९ पर्यंत मुंबईमध्ये ९४ हजार ८५१ अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी असून, त्यातील फक्त ५ हजार ४६१ अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकिल अहमद यांनी ही माहिती मिळवली असून, शिवसेनेने कंगनावर केलेली कारवाई सूड भावनेतून केल्याचे शकिल अहमद यांनी म्हटले आहे.
मुंबईच्या एल विभागात सर्वाधिक तक्रारी
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वांद्रे पूर्व आणि कुर्ला परिसरामध्ये अनधिकृत बांधकामे बांधली गेली असून, मुंबईमध्ये सर्वांधिक तक्रारींची नोंद एल विभागात (कुर्ला) मध्ये झाली असून, ९१९२ तक्रारींपैकी पालिकेने फक्त ३२३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे.
हा पैसा जातो कुठे?
अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना लागणारा पोलीस बंदोबस्त तसेच इतर साधनांवर दरवर्षी पालिकेकडून २० कोटी खर्च केले जातात. मात्र आतापर्यंत पालिकेने केलेली कारवाई पाहिली तर हा पैसा नेमका जातो तरी कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी १५ हजारपेक्षा अधिक नोटीस अनधिकृत बांधकामांबाबत पालिका बजावते मात्र कारवाई १० ते २० टक्के होते. त्यामुळे उर्वरित अनधिकृत बांधकामावर पालिका कारवाई कधी करणार? बेकायदेशीर बांधकामांसाठी आज किती अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली असा सवाल शकिल अहमद यांनी विचारला आहे.
तुमने जो किया अच्छा किया 🙂#DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
मेले तरी तुम्हाला एक्सपोज करणार
दरम्यान कंगनाने कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला असून, ‘मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही’, असे म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचे नाव घेत धमकी दिली आहे. आता घर फोडाल, उद्या माझे तोंड फोडाल आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचे आहे तुम्ही काय काय केले आहे ते!’ असे ट्विट कंगनाने केले आहे.
Join Our WhatsApp Community