महापौरांकडून आपल्याच समिती अध्यक्षाला कात्रजचा घाट

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कुरवळताना महापौर आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांवर अन्याय करत असल्याने, आता स्वपक्षातूनच नाराजीचा सूर आळवायला सुरुवात झाली आहे.

126
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्तक्षेपामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक नाराज असतानाच, स्वपक्षातील  नगरसेवकही त्यांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराज होत आहेत. भाजप नगरसेवकांच्या प्रभागात उद्घाटनाच्या निमित्ताने प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन, हजेरी लावणाऱ्या महापौरांना आता आपल्याही समिती अध्यक्षांना कात्रजचा घाट दाखवला आहे. मागील कोरोना काळात आरोग्य समिती अध्यक्षांना सोबत घेऊन फिरणा-या महापौर आता या अध्यक्षांना डावलून, एकट्याच फिरुन उद्घाटन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आरोग्य समिती अध्यक्ष ज्या प्रभाग समितीच्या सदस्य आहेत त्या प्रभागातील उद्घाटनाला सुद्धा महापौर आणि सहाय्यक आयुक्तांनी त्यांना डावलल्याचे दिसून आले आहे.

कोविड केअर सेंटरचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

के/पश्चिम विभागातील प्राणवायू पुरवठा करणाऱ्या १४० बेडच्या कोविड केअर सेंटरचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या पुढाकाराने जोगेश्वरी पश्चिमच्या मुंबई महापालिकेच्या वतीने परिरक्षित करण्यात येणाऱ्या एस.आर.ए. चाँदीवाला इमारतीमध्ये १० माळ्यांचे २८० खोल्यांचे हे कोरोना काळजी केंद्र चालविण्यात येणार आहे. २८० पैकी “डॉक्टर फॉर यू” या संस्थेच्या सहकार्याने या ठिकाणी प्राणवायू पुरवठा करणाऱ्या १४० रुग्णशय्या संचालित करण्यात येणार असून, यापैकी आज ४० रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात आली आहे. उर्वरित १०० रुग्णशय्या लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
IMG 20210519 WA0016

लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेता, त्यांच्यासाठी ३० रुग्णशय्या याठिकाणी प्रस्तावित असून, यापैकी २ रुग्णशय्या तयार आहेत. मुंबईमध्ये प्रथमच लहान मुलांसाठी रुग्णशय्या तयार झाली असून, लहान मुलांना याठिकाणी खेळणी तसेच मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. डॉक्टर फॉर यू या संस्थेची संपूर्ण टीम ऑक्सिजन रुग्णशय्या हाताळणार असून, त्यासोबतच इतर व्यवस्था मुंबई महापालिकेचे कर्मचारी हाताळणार आहेत.

स्वपक्षातही नाराजीचा सूर

मात्र, याचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करताना, त्यांना आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांचा  विसर पडला. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महापौरांना निमंत्रित करताना आरोग्य समिती अध्यक्षांना डावलले. परंतु आपल्याच सत्ताधारी पक्षाच्या समिती अध्यक्षांना प्रशासनाने निमंत्रित न केल्याने महापौरांनीही प्रशासनाला जाब विचारला नाही. त्यामुळे खुद्द महापौरच आता आपल्याच नगरसेवकांना डावलू लागल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कुरवळताना महापौर आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांवर अन्याय करत असल्याने, आता स्वपक्षातूनच नाराजीचा सूर आळवायला सुरुवात झाली आहे.

मग जाणीव होईल

मागील काही दिवसांपासून मुंबईत एकमेव महापौर रस्त्यावर उतरुन काम करत आहेत आणि इतर अध्यक्ष व महापालिकेतील नेते घरी बसून आहेत, असे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न किशोरी पेडणेकर यांच्याकडून सुरू आहे. महापौर पदाच्या मस्तीत सध्या त्या असून, त्यामुळे त्यांना इतर सहकारी नगरसेवकांचा विसर पडतोय. त्या या पदावरुन फक्त बाजूला झाल्या की त्यांना नगरसेवक पदाची जाणीव होईल, अशा  प्रतिक्रिया विरोधी आणि सहकारी नगरसेवकांमधून व्यक्त होत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.