मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून सध्या महापौर पदाचे महत्वाचे कमी केले जात असून, यापूर्वी पक्षाने त्यांच्याकडील महिला विभाग संघटकपद कायम ठेवत त्यांची निवड प्रवक्तेपदी केली. त्यामुळे या महापौर आहेत की पक्षाच्या पदाधिकारी असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच, गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर या चक्क महिला आघाडीने केलेल्या मोर्चात सहभागी झाल्या. महिलेस मारहाण करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक करावी या मागणीसाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या परिमंडळ ११च्या पोलिस उपायुक्तांची त्यांनी भेट घेतली. या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी चक्क महापौरांनी सभागृहाच्या कामकाजाला दांडी मारली.
आधीच महापौर महिन्याला नियोजित सभा घेत नाहीत. त्यातच गुरुवारी झालेल्या सभेकडेही त्यांनी पाठ फिरवून आपल्या महापालिकेची सभा नव्हे तर पक्षीय राजकारणातच अधिक स्वारस्य असल्याचे दाखवून दिले.
(हेही वाचाः महापालिकेत पीआर एजन्सीची नियुक्ती: भाजपाने केला विरोध)
काय झाले नेमके?
बोरीवली येथील भाजपाच्या नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात बोलावून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न भाजपाच्याच वॉर्ड अध्यक्षांनी केला. त्यामुळे या वॉर्ड अध्यक्षांना तातडीने अटक करावी, तसेच महिलेस मारहाण करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यास अटक करावी, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ ११ चे उपायुक्त यांची बोरीवली पोलिस ठाण्यात जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, महापालिका उपनेत्या व सभागृहनेत्या विशाखा राऊत, प्रवक्त्या संजना घाडी, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि विभाग संघटक सुजाता शिंगाडे व महिला लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर की पक्ष पदाधिकारी?
विशेष म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर या स्वत: या शिष्टमंडळात सहभागी झाल्या होत्या. महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती. परंतु महापौरांनी सभागृहाच्या कामकाजात भाग न घेता शिवसेना महिला शिष्टमंडळात सहभागी होण्यात धन्यता मानली. महापौरांना सभागृहाच्या कामकाजाऐवजी पक्षाच्या राजकारणात अधिक रस असून, महापौर पदावर असलेल्या व्यक्तीकडून पक्षाचीच बाजू मांडली जात असल्याने नक्की त्या मुंबईच्या महापौर आहेत की पक्षाच्या पदाधिकारी, असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.
(हेही वाचाः ‘शिवसेना’ लय भारी, ‘खड्ड्यात’ गेली जबाबदारी! मुंबईकरांचे रोजचे हाल दाखवणारा व्हिडिओ)
नगरसेवकांना चिंता
मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सध्या ऑनलाईन सुरू असून, महिन्याला किमान चार ते पाच सभा होणे बंधनकारक आहे. परंतु महापौर या केवळ दोन पेक्षा अधिक सभा घेत नसून, दुपारी अडीच वाजता असणारी सभा सायंकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत सुरू करत असल्याने, सर्वसाधारण सभेचे महत्वही कमी होताना दिसत आहे. ज्या जनतेने नगरसेवकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी नगरसेवक म्हणून निवडून दिले, त्याच नगरसेवकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी सभागृहाचे व्यासपीठच बंद होत असल्याने, नगरसेवकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
भाजपा नगरसेवकांचे भान हारपले
गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौर सुहास वाडकर यांनी कामकाज चालवले. परंतु या सभेत भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी आभासी सभेऐवजी थेट सभा घेण्याची मागणी करत, हाती फलक घेऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभेचे कामकाज या गोंधळात करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांच्यासह अन्य तीन जणांना श्रध्दांजली वाहताना तसेच राष्ट्रगीताच्या वेळीही भाजपाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातल्याने नक्की आंदोलन कुठे आणि कसे करायचे, याचेही भान भाजपाच्या नगरसेवकांना नसल्याचे दिसून येत होते.
(हेही वाचाः नालेसफाईची कंत्राटे मान्य, पण रस्ते विकास कामांची अमान्य: एकाच अतिरिक्त आयुक्तांकडून असे का घडते?)
Join Our WhatsApp Community